बेळगाव दक्षिण चा गड समितीला मी मिळवून दिला आहे, याची जाण ठेवा, यावेळीही मी इच्छूक आहे पण एकीने दुसरा उमेदवार दिल्यास शांतही बसण्याची तयारी आहे, पण कुणीही मला डीवचू नका, हे शब्द आहेत आमदार संभाजी पाटील यांचे….
निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बेळगाव live ला मुलाखत दिली. मतदारसंघ कोणताही असो सर्वजण मिळून एकीने एक उमेदवार दिला तरच यश मिळणार आहे.दोघांनी दोन उमेदवार उभे केले तर मतदारांनी काय करायचं? कुणाची समिती खरी या वादात मतदार भरडणार. नुकतेच मा पवार साहेब येऊन गेले त्यांनी प्रश्नासाठी ५ जागा निवडून देण्याची मागणी केली त्याचा विचार संपूर्ण सीमाभागातील मतदारांना आहे तर नेत्यांना का नाही? असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला.
माझ्यासारख्यांनी मीच सारखं म्हटलं तर चालणार आहे काय? सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य आहे पण कारण नसताना जर कोण मला हिणवत असतील तर मात्र शांत बसणार नाही. असेही त्यांनी सांगितले.
सीमाप्रश्नासाठी काय केलं असं कुणी विचारलं तर सांगण्यासारखं फार आहे, बेळगावच्या तत्कालीन महिला महापौर विजयालक्ष्मी चोपडे यांना घेऊन आम्ही दिल्लीत उपोषण केलोय. ज्यांनी सीमाप्रश्नासाठी कार्य करतात त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर ते सात दिवसांचं उपोषण मागे घेतलं होतं.या आठवणीही त्यांनी सांगितल्या.
घटक समितीकडे अर्ज द्यायला माजी काहीच हरकत नाही. मात्र घटक समिती एक होणार की दोन होणार हा प्रश्न आहे.शहरामध्ये दोन समित्या आहेत. किरण ठाकूर यांना पवार साहेब आले तेंव्हा मान दिला गेला नाही. कार्यक्रमाची रूपरेषा आखणाऱ्यांनी हा घोळ केला. पवार साहेबांनी किरण ठाकूर यांना वारंवार पुढे बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पाठीमागेच बसले. त्यांचे महत्व ओळखून त्यांना स्थान दिले असते तर ते योग्यच झाले असते, पण एक राष्ट्रीय नेत्यासमोर दाखवलेली दुफळी चुकीची आहे. त्यांच्यासमोर असे मतभेद दाखवून देणे चुकीचे आहे.
सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर सगळ्या जागा निवडून येतात. मागच्या टर्म ला समितीचे आमदार नव्हते तो गड आम्ही किरण ठाकूर यांच्या साथीने परत आणून दिलाय.
गेल्या चार वर्षांत सतत मराठी भाषिक महापौर केला आहे. आमचे योगदान आहेच त्याचप्रमाणे आजच्या युवकांच्या योगदानाकडेही लक्ष द्यायला पाहिजे, युवकांनी सीमाप्रश्न तेवत ठेवला आहे, त्यांच्या सहभागाने उर भरून येण्याची परिस्थिती आहे.असे आमदार बोलतात.
सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा ही गरज आहे कारण अडकीत्यात सापडल्यासारखी आमची अवस्था आहे. याकडे नेत्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.