बेळगावात आचार संहिता सुरु असल्याने महाराष्ट्र सीमेपलीकडे ओल्या पार्ट्या आणि मतदारांना बोलावून खिरापती वाटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भाग महाराष्ट्र सीमेलगत आहे या पश्चिम भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता चक्क महाराष्ट्राच्या हद्दीचा आसरा घेतला जात आहे.
सध्या बेळगाव तालुक्यात एका महिला उमेदवारा कडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुकर शेगड्या आणि रोख रक्कम वाटप करण्यात येत असताना चंदगड तालुक्यात अनेक ठिकाणी मतदारांना जेवणावळ रोख रक्कम दिली जात आहे. उचगाव भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोदाळी येथील माऊली मंदिरात देखील हे प्रकार सुरु झाले आहेत. माऊली मंदिर हे कडक आणि नवसाला पावणार देवस्थान आहे या मंदिर परिसरात उचगाव भागातील मतदारांना नेऊन जेवणावळ देऊन रोख रक्कम देऊन देवीला गाऱ्हाणे घालून मतदारांना बांधून घेण्याचा प्रकार देखील केला जात आहे.
आचार संहिता कर्नाटकात आहे महाराष्ट्रात नाही नेमका याचाच फायदा घेत राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी खिरापती वाटण्याचे सत्र महाराष्ट्रात सुरु केले आहे. चंदगड तालुक्यात देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी गस्ती वाढवाव्यात आणि कुकर शेगडी वितरण करून मतदारांना आकर्षित करणाऱ्या वर नियंत्रण आणावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.