शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचाच प्रचार करावा, अशी मागणी लावून धरली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जगभरातील मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करता. कर्नाटकात सीमाभाग मागील ६२ वर्षांपासून पिचत पडला आहे. तेथे महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची इच्छा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवते, यामुळे त्या भागात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाऊन समितीला बळ द्यावे, त्यांनी भले संपूर्ण कर्नाटकात भाजपचा झेंडा घेऊन फिरावे पण सीमाभागात समितीचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे कारण हे त्यांचे कर्तव्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना कर्नाटकात विधानसभेच्या ५० जागांवर लढणार आहे. पण आम्ही सीमाभागात फक्त आणि फक्त समितीचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशीच भूमिका महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी राबवावी अशी त्यांची मागणी आहे.
बेळगाव येथे जाऊन भाषण केल्यावर आपल्यावर गुन्हा दाखल झाला याचा आपल्याला गर्व आहे. शिवसेनेने सीमाभागातील जनतेसाठी नेहमी मदतीची भूमिका घेतली आहे. तेथील मराठी भाषिक तडफडत असतांना हीच भूमिका घ्यायला हवी उलट महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी सीमाभागात जाऊन मराठी माणसाची बाजू घ्यावी आणि अशा केसीस घालून घ्याव्या असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.