सीमाभागाची ज्यांच्यावर आशा आहे असे नेते शरदरावजी पवार बेळगावला आले, त्यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले, सीमावासीयांना एक व्हा असे त्यांनी सांगितले आणि ते गेले…. पण पुढे काय? हा प्रश्न गंभीर झालाय.
पवारांच्या मेळाव्याचे उद्दिष्ट होते ते एकीचे. वेगवेगळी मते आणि विचार तसेच उमेदवारीच्या हट्टाने महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांत( कार्यकर्त्यांत नव्हे) मागील काही वर्षांत बेकी झाली आहे. सीमाप्रश्नी खरेच तळमळ असलेल्या आणि या प्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात महत्वाची जबाबदारी निभावत असलेल्या पवारांनाही ही बेकी समजली. आणि यामुळे निवडणुकीत पराभव होऊ शकतो याचा धोका ओळखून त्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून एकीचा कानमंत्र दिला, सगळ्यांनी पहिला एक व्हा आणि प्रा एन डी पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन उमेदवार निवडीवर शिक्का मोर्तब करा असेच पवार यांनी सांगितले.
वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या आणि या वयातही तसेच कर्करोगाने शरीर त्रासात असतानाही देशातल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणारे नेते म्हणून पवार यांची ओळख आहे. अशा ज्येष्ठ नेत्याने बेळगावात येण्याची तयारी केली असताना आणि सर्व कार्यकर्ते जोशात असताना त्याच पवार यांच्या समोरही आपल्यातील कुपमंडुक प्रवृत्तीचे दर्शन या नेत्यांनी घडवणे दुर्दैवी आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने एकी व्हावी ही अपेक्षा बाळगणाऱ्या शरद पवार या ज्येष्ठ नेत्याचाही या प्रकारांनी भ्रम निरास झाला आहे. समिती नेत्यांनी आता एकी करणे गरजेचे आहे. याबाबतीत मार्गदर्शक प्रा एन डी पाटील यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे, नाहीतर पूर्वी जे एक दोन मतदारसंघात झाले ते आता साऱ्या ठिकाणी होण्याचा धोका आहे.
समिती ही कुणाची मक्तेदारी नाही. आणि फक्त आपणच प्रामाणिक म्हणून काय होते हे एकच भान बाळगून नेत्यांनी वागायची गरज आहे. मार्गदर्शकांनीही याच भूमिकेने साऱ्यांमध्ये समन्वय साधावा लागेल नाहीतर पवार आले आणि गेले पुढे काय असेच म्हणावे लागेल.
सगळे एकत्रित व्हा.मराठी लोकांना पुढे आना.