बेळगाव उत्तर मतदार संघात पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी एकच ऊमेदवार महाराष्ट्र एकीकरण समितीने द्यावा. कुणीही बंडखोरी करून आपलाच उमेदवार पाडवण्याचा प्रयत्न करू नये. असे माजी महापौर विजय मोरे यांचे म्हणणे आहे.
आपण यावेळी पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न विचारला तर राजकारण हा आता आपला प्रांत नाही. आपण पूर्णपणे सामाजिक कामाला वाहून घेतले आहे, यामुळे आमदारकीची निवडणूक लढवण्याची आता इच्छा नाही, जो उमेदवार समिती देईल त्याला बहुमताने निवडून देण्यासाठी आपण नेते किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार अशी माहिती त्यांनी दिली.
२००८ च्या निवडणुकीत माझा अर्थात समिती अधिकृत उमेदवाराचा आमच्याच माणसांनी पराभव केला, बंडखोर उमेदवार उभारला नसता आणि जातीचे राजकारण केले गेले नसते तर आज सलग दहा वर्षे समितीची सत्ता राहिली असती, विजय मोरे मागासवर्गीय आहे त्याला मतदान करू नका असे प्रचार करून काही आमच्याच लोकांनी नुकसान करून घेतले.
हा इतिहास जाणून घेऊन नवीन कार्यकर्त्यांनी जे एकीचे प्रयत्न सुरू केले आहेत ते अभिनंदन करण्यासारखे आहेत. मी हरलो असे न बघता सलग दोनवेळा पराभव पदरी पाडून घेण्याचे कृत्य करून मराठी अस्मितेच्या लढ्याचे नुकसान केलेल्या लोकांनी आता शहाणे झाले पाहिजे नाहीतर पराभवाची हॅट ट्रिक होऊ शकते.
महानगरपालिकेत महापौर म्हणून निवडून आलो तेंव्हा फक्त तीन महिन्यात सीमाप्रश्नाचा ठराव करून सत्तेला लाथ मारणारे आमचे कोन्सिल आहे, तरीही जो प्रकार २००८ च्या निवडणुकीत झाला तो अपमानास्पद होता, म्हणूनच अशा आमदारकीची स्वप्ने न बघता फक्त सामाजिक काम करणे हे उद्दिष्ट मी निवडले आहे, असेही मोरे म्हणाले.
आज आमदार खासदार जी कामे करत नाहीत ती सामान्य जनतेच्या कामे मी करतो. यामुळे काही राष्ट्रीय पक्षांनी मला त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची गळ घातली होती, पण समितीशी प्रामाणिक असल्याने आपण मोहात पडलेलो नाही, राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी घेऊन आमदार होऊन मराठी माणसांची मन दुखावणी करणे आपल्याला पटले नाही.
आज माझे काम बघून तुम्हीच प्रबळ उमेदवार असे काही समितीचे युवा कार्यकर्ते माझ्या मागे लागले आहेत, पण मी निवडणुकीत अजिबात इच्छूक नसून समितीचा विजय घडवून आणणे हेच माझे उद्दिष्ट असल्याचे मोरे स्पष्टपणे सांगतात.
बेळगाव live ने संपर्क साधला आणि मुलाखत घेतली याचे आभार पण इच्छूक उमेदवार म्हणून माझे प्रोजेकशन नको तर एकच उमेदवार देण्यावर भर देऊया असेही त्यांनी सांगितले.