भाजप पदाधिकारी आणि विणकर नेते पी डी तथा पांडुरंग धोत्रे यांच्यावर झालेला हल्ला जीव घेण्याच्या उद्देशानेच झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
रविवार दि ११ रोजी ही घटना घडल्यानंतर धोत्रे यांना सर्वप्रथम सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. पोट, पाठ आणि इतर नाजूक भागांवर जोरदार लाथांनी प्रहार झाल्याने त्यांना असह्य वेदना होत होत्या, यामुळे त्याच दिवशी त्यांना अधिक उपचारांसाठी केएलई हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. आज पर्यंत तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सर्वप्रथम पोलिसांनी जबानी घेतली तेंव्हा धोत्रे जबाब देण्याच्या परिस्थितीत नव्हते, पण इतर जबाब व धोत्रे यांची जबानी तसेच पंचनामा केल्यानंतर हा हल्ला त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच केल्याचे उघड झाले आहे.
त्यांच्याच पक्षातील लोकांना धोत्रे हे डोईजड होत असल्याने त्यांना संपवण्याचा हेतू ठेऊन हा हल्ला झाला होता असे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी योग्य तपास केला आहे. आता राजकीय बुरखा पांघरून वावरणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी धोत्रे आणि त्यांच्या समर्थकांनी केली आहे.