दोन टर्म नगरसेवक आणि सीमा लढयात गेली 50 वर्ष कार्य करत असलेले शहरातील 25 हुन अधिक संस्थांत कार्यरत माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी देखील समिती कडून दक्षिण मतदार संघातून आपली दावेदारी सांगितली आहे.
मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा सर्वात जुना कार्यकर्ता आहे. दहावी पासून सक्रिय असून असून मागील पन्नास वर्षांपासून कार्य करत आहे. मनपात दोनवेळा निवडून आलो पण तिकीट कधी मागीतलं नाही. मला समितीचं लेबल लावा आणि निवडणुकीत निवडून द्या असं मी कधी म्हटलं नाही. आमच्या वॉर्डात अनेक मराठी उमेदवार राहणार त्यात एकाला समिती म्हटलं तर दुसरा नाराज होणार यामुळे ओपन वॉर्ड ठेऊन निवडून आलो. मात्र स्वतःच्या जीवावर निवडून आलो म्हणून चुकीचा निर्णय घेतला नाही, समितीच्या मराठी नगरसेवक गटाशी प्रामाणिक राहूनच कार्य केले आहे अस त्यांनी बेळगाव live ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
महा पालिकेत प्रत्येक सर्वसाधारण सभेत लक्षवेधी सूचना मांडून समस्यांवर भर दिला आवाज उठवला आहे. चर्चेत सहभाग घेतला आहे, लोकांची कामे करण्यावर भर दिला आहे.
दरवर्षी नगरसेवक असताना वार्षिक आढावा घेत होतो, यावर्षी काय काम केले आणि पुढे काय करणार आहे हे जाहीरपणे सांगत होतो. यामुळे नगरसेवक म्हणून कारकीर्द एकदम गाजली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजवर जे जे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झालो आहे. कधी कोणताही कार्यक्रम चुकवलेला नाही असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की मी माझा पूर्णवेळ समाजासाठी दिला आहे. आई वडील आणि भावांनी मला याबाबतीत पूर्ण सहकार्य केले आहे. घरची कुठलीही जबाबदारी दिली नाही यामुळे मुंबई, दिल्ली मोर्चे झाले, वेगवेगळी आंदोलने झाली, कारावास भोगला यामुळे या कार्याची दखल समितीने घ्यायला हवी असे माझे प्रामाणिक मत आहे. अशी दखल घेऊन जर उमेदवारी दिली तर जनता मोठ्या बहुमताने आपल्याला निवडून देऊ शकेल.
सर्व कार्यकर्त्यांचा लढा हा एकाच मार्गाने सुरू आहे. यामुळे एकी झाली पाहिजे आणि सर्वांच्या ताकदीने उमेदवार निवडून आणला पाहिजे . युवक कार्यकर्ते जे प्रयत्न एकीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचे अभिनंदन करावे लागेल.
उमेदवारी कुणाला देतात हे महत्वाचे नाही. व्यक्ती अजिबात महत्वाची नाही. मला दिले तर ठीकच आहे, कुणालाही देऊ देत त्याला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याची आपली तयारी आहे. यापूर्वी जसं काम केलं त्याप्रमाणे किंबहुना त्याही पेक्षा जास्त काम करायची आपली तयारी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ज्याची निवड करेल त्याला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेनअशी देखील भूमिका त्यांनी मांडली.
सकल मराठा क्रांती मोर्चा बेळगावात झाला तेंव्हा बेळगावतही मुस्लिम समाजाने मदतीसाठी पुढाकार घेतला होता, शहापूर भागातील मुस्लिम बांधवांना एकत्र आणून त्यांना या नियोजनात सहभागी करून घेण्यासाठी बैठक घेतली होती. मुस्लिम बांधवांनी जाहीरपणे पाठींबा दिला होता. यापूर्वी दोन निवडणुकात मुस्लिम समाजाने मला जोरदार पाठींबा दिला आहे, मागासवर्गीय समाजाशीही सलोख्याचे संबंध आहेत. जातीय ऐक्य निर्माण केल्याबद्दल माझा पोलीस दलानेही सत्कार केला आहे. या संबंधांचा नक्कीच उपयोग महाराष्ट्र एकीकरण समितीला होणार आहे असही देखील ते म्हणाले.