बेळगाव मध्ये ३१ मार्च रोजी होत असलेल्या सीमावासीयांच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येणार ही बातमी सीमावासियात उत्साहाची ठरत असतानाच काही कन्नड संघटनांनी याला खो घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जेडीएस शी युती करणाऱ्या पवारांना सीमावासीयांची बाजू मांडण्याची गरज का वाटावी याचा विचार करावा अशी पत्रकबाजी आता सुरू झाली आहे.
आगामी विधानसभेसाठी जेडीएस ने राष्ट्रीय आघाडी स्थापून कर्नाटकात आपली ताकत वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पवार साहेबांनी या आघाडीत आपला सहभाग निश्चित केला आहे. ही एक बाजू आहे.
दुसऱ्या बाजूला मध्यवर्ती समितीच्या निमंत्रणाला होकार देऊन पवार सीमावासीयांच्या मेळाव्यालाही येत आहेत. खरेतर ते पूर्वीपासूनच सीमाप्रश्नी आपले सहकार्य, सहभाग आणि मार्गदर्शन देत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील लढाही त्यांच्याच मार्गदर्शनाने सुरू आहे, असे असताना समितीची एकी, प्रत्येक मतदार संघात एकच उमेदवार व अंतर्गत वाद मिटवून टाकण्याच्या दृष्टीने त्यांचे येणे महत्वाचे ठरणार आहे.
पवार साहेब आले तर समितीच्या निवडणूक प्रक्रियेला बळ मिळेल आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील ही भीती इतर पक्षांनाही आहे. शिवाय हे निवडून आलेले लोक पुढे त्या युतीत सहभागी झाले तर युतीचेही बळ वाढू शकेल याचीच जास्त भीती दिसते. यामुळे आता या पक्षांनी कन्नड संघटनांना पुढे करून नवे राजकारण सुरू केले आहे.
जेडीएस शी युती आणि सीमावासीयांचा आवाज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मान्य होत नसल्याने पवारांच्या येण्यातच अडथळा आणण्याचे प्रयत्न आत्तापासूनच सुरू झाले असून पुढे काय होणार हे येणारा काळच ठरवेल.