सोने आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या बाबतीत बेळगाव हे पूर्वीपासूनच केंद्र आहे. अनेकवेळा पोलिसांनी सोने आणि अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक करून हे सिद्ध केले आहे. रविवारी असेच तीन किलो सोने घेऊन बेळगावमध्ये दाखल झालेल्या एक मुंबईकरास बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोहन देवकर ( वय ३० रा. बांद्रा वेस्ट) असे त्याचे नाव आहे. बेळगावातील गांधीनगर परिसरात असणाऱ्या हॉटेल सागर जवळ तो संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना सापडला.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण तीन किलो वजन असलेली सोन्याची बिस्किटे सापडली. हे सोने कुणाचे, कुठून आणले, कुठे नेणार हे त्याला सांगता आले नाही तसेच खरेदीची आवश्यक कागदपत्रेही तो हजर करू शकला नाही.
पोलिसांच्या मते या सोन्याची किंमत ९५ लाखाच्या घरात आहे. मोहन देवकर हा अनाधिकृतरीत्या त्या सोन्याची वाहतूक करत होता, यामुळे त्यास अटक करण्यात आली आहे.