बेळगावातील किर्लोस्कर रोडवर असलेल्या नाईट क्लब वर शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यात अटक व इतर कारवाई सुरू आहे. या निमित्ताने डी जे शो आणि नाईट क्लब ची काय आहे दुनिया याचा आढावा बेळगाव live ने घेतलाय.
मुंबई आणि बंगळूर सारख्या शहरात हे डीजे व नाईट क्लब वाढत आहेत. रोज तिथे गर्दी असतेच विशेषतः शनिवारी आणि रविवारी हे पब कमी क्लब गर्दीने व्यापलेले असतात. आयटी क्षेत्रात काम करणारी तरुण मंडळी, वैद्यकीय आणि इंजिनियरिंग चे शिक्षण घेणारी मुले मुली, बड्या श्रीमंतांची मुले तसेच विदेशी वातावरण अनुभवयास आसुसलेले या ठिकाणि येत जात राहतात. या पब च्या आडाने तेथे देहविक्री, अंमली पदार्थ विक्री तसेच इतर अनेक गैर प्रकार चालतात.
बेळगाव शहरात अजून इतके मोठे पब किंवा क्लब नसले तरी सध्या बऱ्याच रेस्टॉरंट नी डीजे शो सुरू केले आहेत. त्यामध्ये live म्युजिकही पाहायला मिळत असून यातूनच शनिवारी आणि रविवारी नाईट आऊट ची कल्पना पुढे येत आहे.
हे असले प्रकार सुरू करायचे असल्यास पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. विशेषतः बेळगावात रात्रभर क्लब किंवा पब चालवायची परवानगीच नाही, तरीही काही ठिकाणी विना परवाना सारे प्रकार सुरू आहेत.
कर्नाटकात बंगळूर शहरात क्लब चालवण्यास परवानगी आहे. ते चालवण्यासाठी स्वतंत्र लायसन्स घ्यावे लागते. कर्नाटक सार्वजनिक करमणूक परवाना व नियंत्रण प्राधिकार तर्फे २००५ च्या कायद्यानुसार ही परवानगी दिली जाते.
दी कर्नाटक live बँड रेस्टॉरंट असोसिएशन ने या २००५ चा कायदा आणि प्राधिकार ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बार व रेस्टॉरंट ची परवानगी घेतल्यावर जादा सेवा पुरवणे हा पायाभूत अधिकार असून स्वतंत्र परवाना घेणे ही या अधिकाराची पायमल्ली होते, असा दावा या संघटनेने केला आहे तो वाद सुरू आहे.
बेळगावमध्ये परवानगी नसताना अनेक ठिकाणी नाईट म्युजिक क्लब चालू राहणे म्हणजे यापूर्वी पोलिसांनीच त्याला खिसे भरून प्रोत्साहन दिले होते हे उघड आहे. फक्त एकच ठिकाणी पडलेली धाड हे राजकीय वैमनस्य बाहेर काढण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केल्याचे उदाहरण असल्याचेही बोलले जात आहे. नुकतेच जेडीएस मध्ये दाखल झालेल्या एका काँग्रेसी नेत्याचा किर्लोस्कर रोडवरील बार चालक खास मित्र आहे. जेडीएस मध्ये गेलेली व्यक्ती ज्या मतदार संघात निवडणूक लढवणार त्या मतदारसंघातील काँग्रेस च्या इच्छुकाने आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून ही कारवाई करायला लावली अशी चर्चा आहे. असे नसल्यास कुठल्या कुठल्या गच्चीवर असे प्रकार चालतात तिथेही पोलिसांनी छापे मारावे लागतील.