बेळगाव पोलीस आयुक्तालय हद्दीत सुमारे २६ चोऱ्या केलेल्या दोन चोरट्यांना सीसीबी निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी उपायुक्त सीमा लाटकर आणि महानिंग नंदगावी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. गड्डेकर आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुकही करण्यात आले.
बेळगाव शहर हद्दीतील २०१६ आणि २०१७ याकाळात झालेल्या चोऱ्यांचा हा तपास आहे. यात महम्मद अझरुद्दीन शब्बीर मुल्ला आणि रफिक इश्फाक अहमद शेख हे दोघे गुंतले होते, त्यांना अटक करून ही कारवाई करण्यात आली.
त्यांच्याकडून सोन्याचे ५४१ ग्राम तर चांदीचे २.१३३ किलो दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी मार्केट पोलीस स्थानक हद्दीत २, शहापूर पोलीस स्थानक हद्दीत ४, एपीएमसी पोलीस स्थानक हद्दीत ५, ग्रामीण पोलीस स्थानक हद्दीत ४, माळमारुती पोलीस स्थानक हद्दीत ९, कॅम्प पोलीस स्थानक हद्दीत १ व काकती पोलीस स्थानक हद्दीत १ अशा चोऱ्या केल्या होत्या.
याचबरोबर गोवा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, हुबळी, धारवाड आणि रामनगर येथेही चोऱ्या व घरफोड्या केल्याची माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे, असेही यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.