महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात वयाच्या ८० व्या वर्षीही पुढे राहणारे, तरुणालाही लाजवेल इतका सळसळता उत्साह आणि जिद्द असलेले, कधीच कुठल्याही पदाची अपेक्षा न धरता फक्त आणि फक्त काम केलेले आणि सीमाप्रश्न सुटावा हा एकच ध्यास मनात घेऊन जगलेले समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते दौलतराज रामचंद्र गोडसे यांचे बुधवारी( दि ३१) निधन झाले, हा प्रश्न सुटावा हे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
ते नावाप्रमाणेच एक राजे होते, जन्मभर अविवाहित होते. समिती नेते आणि कार्यकर्ते जमण्याच्या आधी निश्चित केलेली बैठक किंवा आंदोलनाच्या ठिकाणी ते पहिल्यांदा हजर असायचे. शेवट पर्यंत थांबायचे. एकी किंवा मान मरातबा वरून भांडणाऱ्या, एकमेकांची उनी दुनी काढणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत करायचे, बाबांनो लढत रहा, असा सल्ला द्यायचे. समितीचे प्रत्येक आंदोलन त्यांच्या उपस्थितीशिवाय आणि प्रत्येक बैठक त्यांच्या भाषणाशिवाय झाली नाही. यापुढे हा ज्येष्ठ कार्यकर्ता कधीच दिसणार नाही याची खंत समस्त सीमाभागाला लागून राहणार.
सीमाप्रश्न सुटला असे कानात सांगितल्यावर अनेकजण जीव सोडत आहेत, हा प्रश्न सुटल्यावरच प्राण सोडण्याच्या आणा अनेक जुन्या ज्येष्ठांनी घेतल्या आहेत, पदांसाठी, मोठेपणासाठी एकमेकांवर आरोप करणाऱ्या लोकांनी याची जाण ठेवावी.
Trending Now