“महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कन्नडप्रेमाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खरपूस समाचार घेतला.
कन्नडवर एवढेच प्रेम असेल तर चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकात जावे, असे सुचविताना उद्धव ठाकरे यांनी `तुम्हाला कानडीच्या पोटी जन्मायचे तर तिकडेच जा. महाराष्ट्रात राहू नका,’ असा इशारेवजा सल्ला दिला.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या शनिवारी कर्नाटकातील गोकाकमधील एका कार्यक्रमात भाषणाची सुरवात कानडीमध्ये केली. त्यानंतर `हुट्टीदरे कन्नड नाडली हुट्ट बेकू’ हे कन्नडमधील गीत गायले. मुंबईत शिवसेनेच्या आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना या गीताच्या गायनावरूनच लक्ष्य केले.
ठाकरे म्हणाले, की आम्ही सर्वच भाषांचा आदर करतो. कानडीच्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. आईचा अनादर करून दुसऱयाचा आदर करणार नाही. तुम्हाला सगळे मिळाले. तुम्हाला अमित शहांमुळे लॉटरी लागली आहे. काहीतरी चांगलं करा. तुम्हाला कानडीच्या पोटी जन्मायचे तर तिकडेच जा. महाराष्ट्रात नका राहू. महाराष्ट्रात मराठीचा अभिमानीच राहील