शहराच्या हद्दीत येणार्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातील वसाहतींच्या विकासाकडे गेल्या १० वर्षापासून लक्ष न देता कुंभकर्णासारखे झोपेत असलेले आ. संजय पाटील याना आता जाग आली असून जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी भूमीपूजन केलेल्या कामाची पुन्हा पूजा करुन ग्रामीण मतदार संघात ते आता दादागिरी करीत असल्याचा आरोप लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.
महापालिकेच्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातील सह्याद्री नगर, ज्योती नगर, मार्कंडेय नगर, रामनगर, विजयनगर, चिक्कू बाग आदी वसाहती मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे लक्षात घेऊन बेळगाव महापालिकेला १०० कोटी रुपयांचे अनुदान देतो असे ठाम आश्वासन नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी ग्रामीण मतदार संघाचा दौरा करुन आल्यावर दिले आणि यानंतर यांच्या पाठपुराव्याने वर उल्लेख केलेल्या वसाहतींच्या विकासासाठी ९ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान वितरीत केल्याचे ग्रामीण मतदार संघातील सर्व नागरिकांना ज्ञात आहे.
सरकारच्या १०० कोटी रुपयांच्या अनुदानातून ग्रामीण मतदार संघातील वसाहतींच्या विकासाकरिता विनाविलंब अनुदान वाटप करुन सर्व कामांना जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी गेल्या तीन आठवड्यापूर्वी चालना दिली असताना सुध्दा आ. संजय पाटील महापालिका अधिकार्यांना विश्वासात न घेता कंत्राटदाराला धमकी देऊन विकास कामांची पुन्हा पूजा करतात ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे हेब्बाळकर म्हणाल्या.
शहराला लागून असलेल्या बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या अविकसित वसाहतींकडे दुर्लक्ष करणारे तसेच पालिकेच्या १०० कोटी रुपयांच्या अनुदानाचा ग्रामीण भागातील वसाहतीदारांना लाभ मिळवून देण्यास असमर्थ ठरलेले आ. संजय पाटील हे आता हताश होऊन कंत्राटदारांवर गुंडागिरी करीत ग्रामीण मतदार संघातील जनतेची दिशाभूल करीत आपणच कामे मंजूर करुन आणल्याचे ढोंगी नाटक करीत असल्याची टीका करुन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे