कॅपिटल वन आयोजित मराठी एकांकिका स्पर्धेला गुरुवारी कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे सुरुवात झाली.
मराठी विद्यानिकेतन, बेळगाव या शालेय संघाच्या मिशन पत्रव्यवहार या एकांकिकेने स्पर्धेची सुरुवात झाली. पत्रव्यवहाराचे महत्व सांगणारी ही एकांकिका उपस्थितांची दाद मिळवून गेली.
सोनपरी आणि सहाशिल्प ही 28 पात्रांची एकांकिका बेळगावच्या बालिका आदर्श विद्यालयाने सादर केली. एकांकिकेतील पात्रांनी काव्यमय शब्दात नृत्याच्या सहाय्याने उत्कृष्ट अभिनय सादर केला.
कॉमन टच, बेळगाव या संघाने 20 पात्रांची मिशन मम्मी डयाडी ही एकांकिका सादर केली. वृद्धाश्रमावर भाष्य करणारी ही एकांकिका सामुदायिक अभिनयाने टाळ्या मिळवून गेली.
यानंतर गांधी व्हायचं आम्हाला ही 20 पात्रांची एकांकिका मराठी विद्यानिकेतन बेळगाव या शालेय संघाने सादर केली. ही एकांकिका निर्भयतेचा संदेश देऊन गेली.
यावेळी चिराग मनोहर यांनी चषकाचे अनावरण केलं,संभाजी सावंत देविदास आमोणकर, राजेंद्र पोळ,शिवजी हंडे,हरिभाऊ जोशी,प्रा संध्या देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.