मीन राशी (स्वामीगुरु)
॥ ऊन सावलीचा अनुभव येईल ॥
काळ पुरुषाच्या कुंडलीत शेवटची म्हणजे १२ वी रास असून या राशीचा अमंल विशेष उत्तरकडे असतो. या राशीची व्यक्ती स्वभावाने दयाळू, दानशूर, स्मरणशक्ती चांगली असते. परोपरकारी स्वभाव, किंचीत कधीकधी स्वार्थीपणा दिसून येतो. श्रध्दाळू, तर्कशुध्द, व्यवहारी ज्ञान उत्तम असते, याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हिशोबी वृत्तीच्या असतात. धार्मिक धर्म परंपरा जपणारे असतात. स्वभाव महत्वाकांक्षी असल्याने आपले ध्येय योग्य प्रकारे पूर्ण करतात. तीर्थ यात्रा प्रवास यांची त्याला आवड असते. न्यायप्रिय असतात.
या राशीच्या स्त्रिया दिसण्यात सात्विक असतात. यांना आधुनिक राहणीमान फार आवडत नाही. परंपरेचे पुजारी असतात. हे लोक जास्त करुन द्रव पदार्थांचे व्यवसाय, धार्मिक संस्था, पुरातन विभाग तसेच खाद्यान्नचे व्यापारी यात विशेष आढळून येतात. यात विशेष करुन झोपेत बडबडणे, पायाची तळपायाची दुखणी होतात. जलोदर, ज्वर येणे, निमोनिया या सारखे आजार संभवतात.
जानेवारी-फेब्रुवारी : हा महिना आपणास शुभ फलदायी राहणार आहे. शनी गोचरी आपल्या दशम भावात राहणार आहे. यामुळे या महिन्यात सरकारी क्षेत्रात असणार्यांना तसेच खाद्य अन्नपुरवठा विभाग किंवा शेतकरी वर्गाला हा काळ बरा जाईल. या काळात उत्पन्नात वाढ होईल. तसेच गोचरी गुरु हा आपल्या अष्टम भावात आहे. अष्टमेश गुरु तसा बरा असतो. त्या स्थानात त्याची फळे मध्यम असलीतरी ते अशुभ फळे देणार नाही. या काळात पंचमातला राहू आपल्या स्वास्थ्यासंबंधी चांगला नाही. त्यामुळे या राशीच्या वयस्कर व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी. या काळात आपण पुढील योजना किंवा रुपरेषा जर बनविली तर पुढील काळात ते आपणास बहुउपयोगी राहील. त्यामुळे पुढील कामाचे नियोजन या काळातच करुन ठेवावे. जानेवारी मध्ये येणारे ग्रहण आपणास विशेष चांगले नाही. त्यामु़ळे आपण या काळात शांत व सयंमाने रहावे. नोकरीत असणार्यांनी सयंमाने राहीले तर कार्यालयात, ऑफिसात मान-सन्मान टिकून राहील.
मार्च-एप्रिल : हा महिना महिलांना तसा चांगला राहील. या काळात स्त्रियांचा आत्मविश्वासात वाढ होईल. त्यामळे कार्याला वेग येईल. या काळात कुठल्या तरी क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी चालून येईल. व्यापारी लोकांना नवीन गुंतवणूक करता येईल. लग्नी असलेले बुध, रवि, शुक्र, कला नाट्य क्षेत्राशी तसेच संगीत क्षेत्रात काम करणार्यांना नवीन संधी प्राप्त करुन देईल. नवीन कला प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. त्यात यश मिळेल. परंतु व्दितीयातील हर्षल बोलण्यावर ताबा ठेवणार नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने संयमाने रहावे.
मे-जून : हा महिना मिश्र फलदायी असणार आहे. या काळात तृतीयतला रवि खेळाडूंना चांगला राहील. यश मिळण्यासाठी हा रवि साध्य करेल. या काळात शारीरिक पिडा जाणवत असले तरी त्याचा आवेग कमी होईल. नवनवीन कल्पना सूचतील. जोडीदाराची मागे झालेले वाद या काळात शांत होतील. गरजेपुरता पैसा आपणाला या महिन्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करु नये. व्यापारी वर्गाला जुन्या भागीदारी येणे वसूल होतील. ज्याचे भागीदारीमध्ये तणाव आहेत ते कमी होतील. आपल्या कार्यात आपल्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. कष्टाचे मनोबल फळ मिळेल.
जुलै-ऑगस्ट : या काळात धार्मिक कार्ये घरात होतील. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपण देवधर्मात मन रममाल. कामाची गती जरी मंद असली तरी ठराविक वेगाने ठराविक काळात आपली कामे पूर्ण होतील. शैक्षणिक क्षेत्रात असणार्यांना चांगली फळे मिळतील. तसेच विद्यार्थी वर्गाला नवीन शिकण्याची संधी मिळेल. मात्र या काळात आरोग्याची काळजी मात्र आपणास घ्यावी लागेल. ज्याचे विवाह जुळले नाही या काळात त्यांच्या विवाहाची बोलणी होवू लागतील. त्या संदर्भात हा काळ आपणास शुभ फलदायी आहे.
सप्टेंबर-ऑक्टोंबर : हा काळ सरकारी क्षेत्रात काम करणार्यांना उत्तम असा जाईल. ज्यांना सरकारी नोकरी पाहिजे त्यांना सरकारी नोकरीचे योग येतील. प्रॉपर्टीसंबंधी कोर्टात असणार्या आपल्या केसचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. सरकारी कामातील व्यक्तींना आर्थिक लाभाचा काळ राहणार आहे. मामा, मावशीकडून काही शुभप्रद बातमी मिळेल किंवा त्यांच्याकडून आपणास काही शुभप्रद बातमी मिळेल. ज्यांची लग्ने झाली आहेत त्यांना सासुरवाडीकडून धनप्राप्तीचे योग येतील. ज्यांनी विमा योजनेत गुंतवणूक केलेली किंवा एखाद्या ठिकाणी अडकलेली रक्कम आपणास अचानक मिळेल.
नोव्हेंबर-डिसेंबर : हा महिना थोडा खर्च करणारा राहील. या काळात व्ययातील मंगळ कर्ज प्रकरणे कराल किंवा पैशाची उधळपट्टटी कराल. त्यामुळे या काळात आपण पैसा जपून वापरावा पैशाची तरतूद योग्य प्रकारे केली तर पुढे त्याचा फायदा होईल. नको ते आळ येणे, पोलीस तुरुंगवास यांच्याशी संबंध येवू नये याची काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाने किंवा तरुणाने अयोग्य गोष्टीचा त्याग करावा. कोणत्याही कायद्याविरुध्द काम करु नये, पैशासंदर्भाचे व्यवहार जपून करावे. या काळात महिलांनी घर खर्चावर नियंत्रण ठेवावे. या महिन्याचा उत्तरार्ध तसा चांगला राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. नवीन वर्षात नवीन योजना आखल्या जातील. कौटुंबिक सुख प्राप्त होईल, सहलीचा आनंद घ्याल.
मीन राशीची नक्षत्रे :
पूर्वाभाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती
पूर्वाभाद्रपदा स्वभाव : व्यवहार कुशल, धनी (दी)
उत्तर भाद्रपदा स्वभाव : न्यायप्रिय, त्यागी (दु, भ, झ)
रेवती स्वभाव : कुशाग्रबुध्दी, श्रध्दाळू (दे, दो, चा, ची)
उपासना : पूर्वाभाद्रपदा असणार्यांनी शंकराची सेवा करावी, शिवलीलामृतचा पाठ करावा, चंद्राला खीरचा नैवेद्य दाखवावा.
उत्तराभाद्रपदा असणार्यांनी शनिवारी मारुतीला मोतीचुराचे लाडू चढवावे. शनिस्त्रोत्र वाचावे.
रेवती नक्षत्र असणार्यांनी : बुधवारी विष्णूला तुळशी अर्पण करावी व हिरवे मूग अर्पण करावे. विष्णू सहस्त्र नाम वाचावे.
शुभवार : मंगळवार, गुरुवार
शुभ महिने : ३, ४, ८, ९
शुभ रंग : परपल, पिवळा
शुभ रत्न : पुष्कराज राशीप्रमाणे जोतिषांच्या सल्ल्याने घालावे. अंक शास्त्राप्रमाणे ३ अ अंक गुरुचा.