बेळगाव येथील जिल्हा पंचायत सभागृहात जि.पं. ची विकास आढावा बैठक पार पडली.
गतवर्षी अथणी नजिकच्या झुंजरवाडमध्ये कूपनलिका विहिरीच्या दुर्घटनेने जिल्ह्याला काळा डाग लागला असून यापुढे अशा स्वरुपाची दुर्घटना होऊ नये म्हणून जि.पं. च्या संंबंधित अधिकार्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. निरुपयोगी कूपनलिका विहिरी मुजविण्यात निष्काळजीपणा दाखविल्यास अशा जमिन मालकांना १ लाख रुपयांचा दंड व ६ महिन्याची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचा सीईओ रामचंद्रन आर यांनी इशारा दिला.
शाळा, वसतीगृहे, इस्पितळ आणि इतर प्रदेशात कूपनलिका विहिरीमुळे मुलांना त्रास होणार नाही याची अधिकार्यांनी काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या सर्व भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी योग्य प्रकारे मिळण्याची व्यवस्था करावी अशी सूचना रामचंद्रन यांनी केली.
रायबागच्या मुगळखोड येथे १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे भाषण करणार आहेत. मोठ्या संख्येने तरुण वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने आरोग्य खात्याने त्या भागात रक्तदान, नेत्रदान आणि अन्य कार्यक्रमाबाबत तरुणात जागृती निर्माण करावी असे त्यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्यांना सांगितले.
जि.पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे तसेच आरोग्य, शिक्षण महिला व बाल कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा आणि अन्य विविध खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.