पंधरावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन जांबोटीत येथे ११ फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने सीमाभागातील साहित्यरसिक मराठी बांधवांना साहित्याची अनमोल मेजवानी मिळणार असून मराठीतील नामवंत लेखक – कवींना भेटण्याची संधी लाभणार आहे.
खानापूर येथे नुकतीच या संमेलनाच्या आयोजनाबाबत बैठक झाली. त्यात हेआंतरराज्य संमेलन जांबोटी येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस विलास बेळगावकर, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, अकादमीचे सीमाभागातील समन्वयक गुणवंत पाटील, अनिल पाटील, आबासाहेब दळवी,प्रल्हाद मादार, ईश्वर बोभाटे, मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पंधराव्या संमेलनाच्या आयोजनाचा मान जांबोटीला मिळाला याचा अभिमान असूनहे संमेलन सर्वार्थाने यशस्वी करण्याचा निर्धार विलास बेळगावकर यांनीयावेळी व्यक्त केला.संमेलनाच्या आयोजनासाठी स्थानिक आयोजन समिती गठित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याविषयी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सीमाभागातील विविध सांस्कृतिक संस्था संमेलनाच्या आयोजनात सहभागी होणार असल्याचेयावेळी सांगण्यात आले. सीमाभागातील या परिसराला साहित्य – संस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. घनदाट जंगलाच्या या परिसरावर निसर्गानेसृष्टीसौदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. आद्य मराठी लेखक रा. भि. गुंजीकर यांचे जांबोटी हे गाव असून त्या गावी हे संमेलन होत असल्याचासार्थ आनंद असल्याचे अकादमीचे सीमाभागातील समन्वयक गुणवंत पाटील यांनी सांगितले.
साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ अशी ओळख असलेल्या गुंफण अकादमीच्या वतीने दरवर्षी निरनिराळ्या ठिकाणी या संमेलनाचे आयोजन केले जाते. यापूर्वी महाराष्ट्र, गोवा तसेच सीमाभागातील मणतुर्गे येथे संमेलन झाले होते. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन – संवर्धनासाठी अकादमी कार्यरत असून त्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात, असे अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी सांगितले.