दरवेळी मराठी मतांवर निवडून येऊन मराठीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय पक्षात आता मराठी व मराठा वणवा भडकू लागला आहे. बेळगाव सह परिसरात विधानसभेसाठी कन्नड उमेदवार देऊ नका मराठी उमेदवार द्या अशी मागणी होत आहे आणि मराठी इच्छूक उमेदवारही वाढत आहेत.
सर्व म्हणजे काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षात हा मराठी वणवा पेटत आहे. तर कन्नड भाषिक उमेद्वाराविरोधातील वातावरण वाढत आहे. हे वातावरण राष्ट्रीय पक्षांना तापदायक ठरत आहे. जातीचे राजकारण करणाऱ्या कर्नाटकाला यावेळी मराठा भारी पडण्याची चिन्हे आहेत.
बेळगाव ग्रामिण मध्ये काँग्रेस मधील मराठा उमेदवार सज्ज झाले आहेत, महिला असेल तरी मराठा भाषिक आणि जातीची महिला उमेदवार द्या अशी त्यांची मागणी आहे. याच मतदार संघात भाजप मधील प्रबळ उमेदवार आपली ताकत दाखवत आहेत, भाजप मध्ये मराठा इच्छूकांनी तर सरळ सरळ विध्यमान आमदाराच्या विरोधात बंड पुकारले आहे.
बेळगाव उत्तर मध्ये काँग्रेस कडे मराठी चेहरा नाही. पुन्हा विध्यमान आमदार उमेदवार होणार हेच चित्र आहे. यामध्ये सक्रिय मराठा कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपनेही उत्तर मध्ये कन्नड उमेदवारांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पक्ष म्हणून मराठा कार्यकर्ते शांत आहेत मात्र मतदार प्रबळतेचा विचार करून जातीचा उमेदवार ध्यावा यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे.
दक्षिण मध्ये एकीकडे भाजप मध्ये विणकर उमेदवार ध्या अशी मागणी वाढत आहे, याचा गैरफायदा घेऊन काँग्रेस बाहेरच्या उमेदवारांना आयात करत आहे. यामुळे मूळ मराठा उमेदवार नाराज होत आहेत. मराठा उमेदवारास स्थान द्या अशी त्यांची मागणी आहे.
खानापूर मध्ये समितीचा उमेदवार मराठा असणार हे नक्की आहे. त्याला टक्कर देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस मधील मराठा उमेदवार आपली उमेदवारी निश्चित करून घेण्याचे प्रयत्न करत आहेत.
बेळगावशी संबंधीत या मतदार संघात राष्ट्रीय पक्षांनी मराठा मतदार आणि उमेदवार द्यावेत ही मागणी जोर धरत असतांना आजवर मराठी मतांवर निवडून आलेल्या कन्नड उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरत आहे.