गेल्या दोन महिन्यात बेळगांवसारख्या प्रगतिशील शहरात ५ पेक्षा जास्त वेळा जातीय दंगली ‘घडविण्यात’ आल्या. ‘घडविण्यात आल्या’ हे शब्द जाणीवपूर्वक जबाबदारीने संपूर्ण विचारांती वापरले आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या मे २०१८ म्हणजे ५ महिन्यात येऊ घातलेल्या निवडणूका, भूमाफियांनी दंगलग्रस्त भागात दिसू लागलेली व्यवसायाची संधी आणि गांजाच्या नशेखोरीतून वाढत चाललेले उपद्रवमूल्य असा तिहेरी संगम वारंवार घडणाऱ्या दंगलीतून दिसून येतो.
दंगलीच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण हा हमखास यश देणारा फार्मुला राजकीय व्यक्ती वारंवार वापरतात त्यात बहुभाषिक, बहुरंगी, विविध धर्मीय बेळगांव कसं काय अपवाद ठरेल? बेळगांव शहराला सीमाप्रश्नाच्या वैचारिक लढ्याचा फार मोठा इतिहास आहे. घटनेच्या चौकटीत राहून मराठी माणसांनी हा लढा उभारला आणि आजवर जागृत ठेवला. सूडबुद्धी आणि गुन्हेगार प्रवृत्ती या गोष्टीपासून समितीचा मराठी माणूस सदैव दूर राहिला. जितकेवेळा समिती मजबूत राहिली तितकेवेळा जातीय सलोखा मजबूत राहिला आणि बेळगांव शांत राहील. जातीय भावना पेटवून समितीची ताकद कमी करायचे उद्योग बऱ्याच राजकारण्यांकडून खेळले जातात.साधं उदाहरण द्यायचं तर ‘महानगर पालिका’ तिथं इतर राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे नेते समितीच्या विरोधात गळ्यात गळे घालून असतात तिथं कुठं जातो दोन्ही बाजूचा धर्म अभिमान ?
निव्वळ मराठी लोकांच्या आणि अल्पसंख्याकांच्या एक गट्टा मतदानासाठी हे डाव खेळले जातात हे बेळगावातील तरुणांनी जाणून घेतलं पाहिजे.
सद्याचा अनुभव बघता या दंगलीमुळे सर्वात जास्त नुकसान मराठा समाजाचं होतंय. ज्यांच्या मालमत्तेचं नुकसान होतंय तो मराठा समाज. ज्या निष्पाप मुलांना पकडलं जातंय त्यात ‘मराठा’ समाजाच्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. भाषेच्या राजकारणात आधीच मराठी समाजाला दुय्यम दर्जा सरकारी यंत्रणेकडून दिला जातो. ‘मराठी’ बोलणाऱ्याला काय पद्धतीची वागणूक पोलीस प्रशासनाकडून मिळते याची जाण सगळ्यांना आहे. परप्रांतीयांचे देखील बेळगावात ‘लाड’ होतील पण मराठी माणसाचे नाही. विशिष्ट भाग सतत दंगलीच्या छायेत ठेवायचा आणि तिथल्या स्थावर मालमत्तेचा व्यापार करायचा यासाठी एखादी सोनेरी टोळी तरी कार्यरत नाही ना? या अनुषंगाने विचार करायची आज गरज आहे.
त्याच बरोबरीने गल्ली बोळातील गर्दुल्ले नशेत असताना अथवा नशा भागविण्यासाठी कोणत्याही ठरला जाऊ शकतात अश्या घटना समोर आल्या आहेत. एखाद्याने नशेच्या भरात फेकलेला दगड मोठ्या जातीय दंगलीला कारणीभूत ठरू शकतो. याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे का?
बेळगावात ‘घडवून’ आणल्या जाणाऱ्या दंगली मागे विविध कारणे आहेत. त्याच मूळ शोधल्याशिवाय बेळगांव शांत होणार नाही हे अंतिम सत्य आहे.
मला आजकाल सतत हे सांगितलं जात ‘विशिष्ट धर्माचा आमदार हवा’.
त्यावेळी मी म्हणतो ‘या धर्माचा आमदार झाला तर दंगली थांबून बेळगांव शांत होईल याची हमी द्या अथवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अन्याया विरोधातील लढाईत सामील व्हा तोच मार्ग माणुसकीचा आहे’
आर्टिकल सौजन्य – अमित शिवाजीराव देसाई
कठिन आहे