सस्नेह निमंत्रण
आज देशाच्या लोकसंखेच्या चाळीस टक्केहून अधिक लोकसंख्या ‘बाल-कुमारां’ची आहे. हे ‘बाल-कुमार’च देशाचे भविष्य आहेत. म्हणून त्यांच्यासाठी अग्रक्रमाने आणि स्वतंत्र काहीतरी केले पाहिजे. मुलांचे मन कोरी पाटी असली, तरी त्यांच्यावर आपण जे संस्कार करू, तशी त्यांची सर्वांगाने वाढ होत असते. परंतु, मोबाईल, टी. व्ही.ने या मुलांचे जीवन आणि भावविश्व कुरतडायला सुरुवात केली आहे. आज मुले पुस्तके, मैदानी आणि पारंपरिक खेळ, चित्र-संगीतादि कलांपासून दूर फेकली जात आहेत. पर्यायाने उद्याची पिढी बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या पंगू बनेल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. या मुलांपुढे परंपरेतील गोष्टी कथन करण्याची परंपराही जवळजवळ संपुष्टात आली आहे. आजच्या स्पर्धात्मक युगाने मुलांना ‘रेसचा घोडा’ बनवले आहे. वास्तविक या वायात जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन विकसित होत असतो आणि जग जाणून घेण्याची त्यांना विलक्षण जिज्ञासा असते. म्हणून त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासही महत्त्वाचा असतो. यासाठीच आपण बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.
मुलांचे स्वत:चे विश्व असते. ते विश्वच पुढे जीवन जगण्यासाठी त्यांना उर्जा पुरवत असते. मैदानी, पारंपरिक खेळ, कथन परंपरेतून आलेल्या गोष्टी, चित्र-संगीतादि कला त्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर आणि खंबीर बनवत असतात. केवळ जिंकण्यातच आनंद नसतो, तर मित्रांकडून झालेली हारही जगण्याचे बळ पुरवत असते, समूहजीवन घडवत असते. यातूनच जगण्याशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळते आणि व्यक्तिमत्त्वही संपन्न होते. याविषयीची जाणीवजागृती व्हावी आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठीचे एक पाऊल म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने भाषाविकास संशोधन संस्था ‘बाल-कुमार साहित्य संमेलन’ आयोजित करीत आहे. या साहित्य संमेलनामध्ये भरगच्च कार्यक्रमांबरोबर काष्ट-शिल्प, मातीकाम, चत्रिकला, रांगोळी, अक्षरदालन, पशूपक्षांच्या अद्भुत विश्वाचे दर्शनासह ग्रंथप्रदर्शन असे कार्यक्रम निश्चित केले आहेत.
हे संमेलन आपल्या मुलांच्या भवितव्यासाठीची एक चळवळ बनवूया. यासाठी आपण आपल्या मुलांसहित या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन. धन्यवाद!