बेळगाव आणि भागात सध्या राज्यभरातील डॉक्टरांचे आंदोलन गाजत आहे. देवाचे दुसरे प्रतिरूप म्हणून त्यांना ओळखले जाते. याबाबतीतला पहिला मान आईला आहे, डॉक्टर हे देव मानले जातात. सगळेच नव्हे पण काही अपवाद वगळून जेंव्हा ते लुटारू बनू लागतात तेंव्हाच एखादा आरोग्य मंत्री त्यावर नियंत्रणाचा कायदा आणण्याचा विचार करू शकतो. तसे मंत्री संत्रीही आजकाल धड नाहीत पण कर्नाटकाच्या आरोग्य मंत्री पदावरील रमेश कुमार हे मात्र एकमेव अपवाद आहेत, यामुळे सध्या आंदोलन सुरू असताना सरकार आणि डॉक्टर या वादात नव्या राजकारणाची भर पडत आहे.
आरोग्य हे क्षेत्रही शिक्षणाप्रमाणे सम्राटांना जन्म देण्याचे क्षेत्र झाले आहे. तशी त्याची सुरवात २५ ते ३० वर्षांपासून झाली आणि तेंव्हापासून आजपर्यंत या क्षेत्राने जन्म दिलेले बरेच सम्राट राजकारणात बरेचसे बलाढ्य झाले आहेत. तसे बलाढ्य झालेल्यापैकी सगळेच डॉक्टर नसले तरी डॉक्टरांवर सत्ता गाजवणारे, त्यांना भरीस भर घालून बक्कळ पैसे उकळणारे खासगी हॉस्पिटल सम्राट बरेच आहेत. त्यांना पक्षाचेही बंधन नाही कारण हे प्राणी सर्व पक्षात आढळतात आणि सध्या सुरू असलेले आंदोलन यासारखीच मंडळी हाताळत असल्याची शंका नव्हे खात्री यामुळे निर्माण होते.
आरोग्यमंत्री रमेशकुमार यांनी विधानसभेत एक मुद्दा नक्कीच चांगला मांडलाय, डॉक्टरी संप हा “आम्ही गुन्हेगार नाही , यामुळे त्यासाठी हा कायदाच नको “अशा आशयाचा आहे. कायदा हा गुन्हा केल्यानंतर लागू केला जातो आणि पुढे कोणी तसा गुन्हा करू नये ही त्यामागची भूमिका असते. कायदाच नको म्हणून तो अस्तित्वात येण्यावरच बंदी घालण्यापेक्षा “आम्ही कधीच गुन्हा करणार नाही” असे वर्तन करा, असेच त्यांना सांगायचे होते.खून केल्यावर कलम ३०२ अन्वये कारवाई होते, तुम्ही कायध्याच्या भीतीने खून करू नका पण कलम ३०२ हटवा असे तुम्ही म्हणू शकत नाही, हे उदाहरण योग्य वाटते.आपल्या सरकारला आणि विरोधकांनाही त्यांनी तुम्ही डॉक्टरांच्या बाजूने की गोरगरीब जनतेच्या बाजूने असा प्रश्न विचारून कोंडीत पकडले आहे, बहुतेक हा विधेयक होणारही नाही कारण दोन्ही बाजूने म्हणजे सरकारात आणि विरोधी बाकावर दोन्ही ठिकाणी हॉस्पिटल सम्राट बसलेले आहेत, स्वतः जनतेच्या मनातून उतरून विरोध करण्याऐवजी त्यांनी डॉक्टरी आंदोलनाची ढाल पुढे केली आहे, असेच काहीसे अंधुक दिसत आहे.
सरकारी योजनांच्या जीवावर बलाढ्य झालेल्या इस्पितळांना हे विधेयक नक्कीच त्रासदायक ठरणार आहे. लॅपटॉप, कॉम्पुटर आणि विदेशी टूर, दारूच्या बाटल्या, आलिशान कार, सेंट आणि बरेचकाही च्या आशेपोटी ठराविक कंपन्यांची महागडी औषधे गरीब रुग्णांच्या माथी मारणाऱ्या डॉक्टरना हे विधेयक अतित्रासदायक ठरेल. जे प्रामाणिक डॉक्टर आहेत ते इस्पितळ सम्राटांच्या दबावाखाली या आंदोलनात फरफटत चालले आहेत, तर इस्पितळात काम करणारा इतर वर्ग हातावरचे पोट कसे सांभाळायचे या विवंचनेत आहे. या काळात जे वारले त्यापैकी सम्पाचे बळी खरे किती तो विषय संशोधनाचा ठरेल मात्र देवाने माणुसकी सोडून त्यांचे जीव हिरावून घेतल्यातलाच प्रकार नक्कीच म्हणता येईल.
“आज डॉक्टर आंदोलन करू शकतात कारण ते संघटित आहेत, मात्र मी जो गरीब माणूस लुटला जात आहे त्या असंघटित माणसाचा प्रतिनिधी आहे, ” त्याला संघटित करणे जमत नाही म्हणून मी बोलतोय” असे आरोग्यमंत्री म्हणाले तेंव्हा विधानसभेच्या सभापतींनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या, यातच सारेकाही स्पष्ट होते.
सध्या तर डॉक्टरच स्वतः राजकारणात उतरत आहेत, तशी तयारी बेळगावच नव्हे तर सर्वत्र सुरू आहे, यामुळे पुढील काळात सम्राटांची संख्या वाढणार आहे. यामुळे आंदोलने आणि विरोध वाढेल शिवाय आंदोलनाचे इव्हेंटही रंगू लागतील.
सध्या दोन्ही बाजूने माघार आणि सुवर्णमध्य हेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकेल असे तज्ञ मात्र प्रामाणिक डॉक्टरांचे मत आहे.