आमदारांच्या सांगण्यावरून नगरसेवक अजीम पटवेगार यांना माळ मारुती पोलीस निरीक्षक टिंगरिकर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करत मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधींनी पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली.
या घटनेची निष्पक्ष चौकशी करा अशी मागणी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांच्याकडे करत या घटनेला आमदार फिरोज सेठ यांना जबाबदार धरत त्यांचा पुतळा देखील जाळला.
या बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार न्यू गांधी नगर येथील मुश्ताक दावणगेरे वय 30 वर्ष या युवकास मारामारी प्रकरणात सोडवण्यासाठी अजीम पटवेगार हे पोलीस स्थानकात गेले असता पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर यांनी अजीम यांच्या सोबत धक्का बुक्की केली आमदार फिरोज सेठ यांच्या दबावाखाली पोलीस निरीक्षकानी धक्काबुक्की केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
या घटनेच्या विरोधात माळ मारुती पोलीस स्थानका समोर देखील आमदार आणि पोलिसांच्या कृत्या चा निषेध करण्यात आला.या घटनेची संपूर्ण चौकशी करा असे निवेदन पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांना देण्यात आले आहे.यावेळी चिडलेल्या मुस्लिम समाजातील नेत्यांनी आमदार फिरोज सेठ यांच्या प्रतिकृतीचे दहन देखील केलं आहे.यावेळी नगरसेवक मुझम्मील डोनी, बंदेनवाज बाळेकुंद्री, मतीन शेख,हाशम भाविकट्टी, फारुख पठाण बाबूलाल बागवान सह न्यू गांधी नगर मुस्लिम जमात आणि यंग कमिटीचे सदस्य देखील उपस्थित होते. विधान सभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदर आमदार फिरोज सेठ यांना थेट विरोध होत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.