राष्ट्रीय पक्षाच्या इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर मतदार राजाला खुश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिवाळी सणात या इच्छूकानी केलेली उधळण मतदार राजाला चिंब भिजवून गेली आहे.
सध्या बेळगाव तालुक्यातील एक महिला उमेदवार पैश्यांची प्रचंड उधळण करत आहे. उचगाव भागातील एक गावात त्या महिलेने दिवाळीत किल्ला करण्यासाठी दीड लाख रुपये दिले आहेत. गणपतीत प्रत्येक मंडपाला पाच हजार रुपये दिल्यानंतर राजहंसगडच्या किल्ल्याच्या बुरुजावर स्वतःचे पोस्टर लावून ही महिला वादात अडकली होती, आता असले वाद शमवण्यासाठी किल्ला बनवण्यास तिने ब्रम्हास्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे. याचबरोबरीने आणखी वेगवेगळ्या माध्यमातून मते एकवटण्यासाठी पैसे वाटण्याचे काम तिने सुरू केले आहे.
एका मल्टीपर्पज सोसायटीचे कर्ज घेण्यासाठी ३ कोटीचे कमिशन देऊन १८ कोटी थकवलेला एक उमेदवार सध्या घरा घरात मिठाईचे बॉक्स वाटून पुन्हा चर्चेत आला आहे. लोक कर्ज काढून सण करतात मात्र त्या स्वयंघोषित व्हेरी ईम्पोरटंट व्यक्तीने कर्ज काढून मिठाई वाटण्याचा प्रकार जास्तच चर्चेला आला आहे. मिठाई खाऊन मतदारांची तोंडे गोड झाली तरी कर्ज देणाऱ्यांची तोंडे मात्र कडू होऊ लागली असून त्याची जोरात चर्चा आहे.
बेळगाव दक्षिण भागात एक उमेदवाराने हॉटेल मध्ये सकाळ संध्याकाळ दोन टाईम नाश्ता सुरू केला आहे, कामाला जाण्यापूर्वी येऊन नाश्ता खावा आणि सायबांना मत द्या, असे आवाहन त्याचे कार्यकर्ते करत आहेत.
बेळगाव उत्तर भागात वैधकीय क्षेत्रातील उमेदवाराने वाटलेल्या पणत्यांची जोरदार चर्चा आहे. सध्या त्याने दिलेल्या पणत्या सर्वत्र झळकल्या आहेत, मात्र समबंधीत हॉस्पिटलचे बिल वाढत आहे, आजारी म्हणून गेल्यावर भरमसाठ बिल घेऊन त्याच पैशातल्या पणत्या वाटल्या जात आहेत अशीही चर्चा आहे.
मराठी मतदारांच्या भावना आपल्याकडे वळवण्यासाठी तोडके मोडके मराठी बोलत हे सगळेच पैसे उडवू लागले आहेत.
खानापुरात साड्या आणि ताटे वाटणाऱ्या ताईची चर्चा आहे. घराच्या उदघाटनावेळी नाराज होऊन गेलेल्या महिलांना या दिवाळीत त्यांनी खुश केले आहे.
समिती नेते मात्र शांत आहेत. काही भागात या राष्ट्रीय पक्ष वाल्यांच्या साड्या, चोळ्या, पणत्या आणि मिठायांचे बॉक्स वाटण्यात तेच आघाडीवर दिसत आहेत.
यापैकी निष्टा विकणारे सोडला तर बाकीचे सध्या देत्यात ते घेवा, समितीसुच मत देवा असा सल्ला देत आहेत.