आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा नव्या दमाने कामाला लागली आहे.वेगवेगळ्या घटक समित्या आणि नेत्यांनी आपली संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक आहे.१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन सीमाप्रदेश कर्नाटकात डांबला गेला, तेंव्हापासून दरवर्षी १ नोव्हेंबर ला काळा दिन पाळला जातो. या काळ्या दिनाबाबत चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती म ए समितीची बैठक शुक्रवार दिनांक १३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंदिर येथे होणार असून सर्वोच्चं न्यायालयातील सीमाप्रश्न व इतर विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे . कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना विरोधात मेळाव्याच्या घोषणेची देखील शक्यता आहे.मध्यवर्तीच्या माध्यमातून सीमाप्रश्नी दिल्ली येथे जाऊन विविध नेतेमंडळींची भेट घेण्याचा प्रयत्न वारंवार झाला आहे.
दुसरीकडे तरुण भारत चे प्रमुख आणि शहर म ए समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी यंदा विधानसभेत समितीचे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सीमालढ्याचा इतिहास तरुण भारत ने छापून युवा वर्गाला जागृत करण्याचादेखील स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे यामुळे समिती आता शांत बसणार नाही हे सिद्ध झाले आहे.
समिती नेत्यांनी आपापसातील वाद असले तरी ते परस्पर मिटवून एकीची मोट बांधली आहे, याचेच दर्शन घडते आहे. यामुळे या निवडणुकीत समिती सर्वच मतदार संघात राष्ट्रीय पक्षांना आव्हान ठरणार आहे.
Trending Now