ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कामासाठी काडा कार्यालयातील बैठक आणि भूमीपूजना वेळी खासदार सुरेश अंगडी यांनी काही ठराविक मंडळींनाच बोलावल्याने इतर भाजप नेते व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. भाजप मधील अंतर्गत वाद सध्या उफाळून आला असून काहींनी खासदारांच्या घरी जाऊन त्यांची खरडपट्टी काढली आहे.
काल मंगळवारी अंगडींनी केलेली मीटिंग आणि काही ठराविक जणांना घेऊन केलेले भूमिपूजन इतर निष्ठावन्त कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यांनी बुधवारी सकाळीच अंगडींच्या घरी जाऊन आपला संताप व्यक्त केला आहे.
भाजप चे दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रबळ इच्छूक पांडुरंग धोत्रे, डॉ एफ दोडमनी, सुनील चौगुले, चिदंबर देशपांडे यांच्या बरोबरच विनायक धाकलूचे, तेजस्विनी धाकलुचे, रावबहाद्दूर कदम हे सारे अंगडींच्या घरी गेले होते. भाजपचे विधानसभा निवडणूक विस्तारक तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुनी यांच्या समोरच हा वाद झाला आहे.
भाजप हा तुमचा खासगी पक्ष आहे का? प्रशासकीय बैठकीत माजी आमदारांचे काम काय? भूमिपूजन करताना बाकीचे नेते आणि कार्यकर्त्यांची आठवण आली नाही काय? तुम्ही दोघा तिघांनीच भाजप खरेदी केला आहात काय? असे प्रश्न विचारून खासदारांना भंडावून सोडण्यात आले आहे.
दक्षिण भाजपची बैठक माजी आमदाराच्या घरात का घेतली जाते? पक्षाकडे दुसरी जागा नाही का? तुम्ही परस्पर समनवय करून इतर निष्ठवंतांना काय संदेश देत आहात? माजी आमदाराच्या ताटाखालचे मांजर का झाला? अशा प्रश्नांमुळे खासदार अंगडी यांची बोबडी वळली होती.
यापुढे तुम्हाला कळवतो अरे यांचे नंबर घ्या असे अंगडी आपल्या पीए ला उद्देशून म्हणल्यावर तर हे कार्यकर्ते आणखी खवळले होते. आमच्या जीवावर निवडून आले आणि आमचे नंबर पण डिलीट केला काय? असा प्रश्न विचारल्यावर तर अंगडींना काय बोलायचे कळले नाही.
यापैकी एका नेत्याने बेळगाव live कडे बोलताना खासदार अंगडी माजी आमदारासारख्या काहींना हाताशी धरून भाजपची प्रतिष्ठा वेशीवर टांगायला निघाले आहेत, त्यांनी हे प्रकार बंद केले तर ठीक नाहीतर आम्ही वरीष्टांपर्यंत जाणार आहे असे सांगितले आहे.