बेळगाव live च्या वाचकांना आमचे विनम्र आवाहन आहे, सहकारी सोसायटी निवडताना सावधगिरी बाळगा आणि कुठेही पैसे जमा करताना काळजी घ्या, आणि फसव्या व्याज योजनेत बळी पडू नका असे आवाहन करण्याची गरज वाटते.
आयुष्यभर राबराबून जमा केलेली पुंजी आपण व्याज मिळेल या आशेने सोसायटीमध्ये भरतो, पैसे ठेऊन घेईपर्यंत लोक गोड बोलतात, मुदत पूर्ण व्हायला आली की त्यांची भाषा बदलते, जगाच्या पैशावर चैनी करून आपली प्रतिष्ठा वाढवून घेत फिरणारे हात वर करून मोकळे होतात, जास्तीत जास्त लोकांना टोपी घालणारेच वाढत आहेत, आपला पैसा त्यांच्या ताब्यात देऊन नंतर भीक मागण्याची वेळ येण्यापेक्षा वेळीच सावध व्हायची गरज आहे.
नुकतीच संगोळळी रायन्ना सोसायटी अडचणीत आली. चेअरमन आनंद अप्पूगोळ याला अटक झाली, 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आता कोर्टाच्या तारखा पडत राहतील, पैसे भरणारे फिरत राहतील आणि काही दिवसांनी सगळे विसरून जातील, जामीन मिळाल्यावर सोसायटीवाले म्हणतील कोर्ट काय देईल ते घ्या! ही वेळ आपल्या कमीविचार करण्याच्या पद्धतीने आली आहे, याला अप्पुगोळ नव्हे आम्हीच जबाबदार आहे, पहिलाच तो सांगतोय तितके व्याज देऊ शकेल काय याचा विचार केला असता तर ही वेळ आली नसती.
आजकाल सोसायट्या काढणे हा धंदा झाला आहे, लोकांचे पैसे जमा करायचे, त्याच पैशांनी गाड्या घ्यायच्या, मोठे मोठे कार्यक्रम करायचे, काळ्याचे पांढरे करून देतो म्हणून सांगून कमिशन खायचे, रियल इस्टेट आणि इतर धंदे सांगून लोकांना भुलवायचे तंत्र सुरू आहे. सोसायटी काढून मोदी जॅकेट घालून फिरणाऱ्या पासून सावध होण्याची गरज आहे. नाहीतर एकदिवस ठण ठण गोपाळ होण्याचीच वेळ येणार आहे.
सरकारच्या अनेक योजना आहेत. राष्ट्रीयीकृत बँका , पोस्ट अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता, पैसे दाखवले की टॅक्स बसतोय म्हणून आशा सोसायट्यांच्या नादाला लागला तर एकदिवस भीक मागावी लागते ते चालतय काय? जर विचार असेल तर डोके खाजवा आणि सोसायटी बुडायच्या आधी पैसे योग्य मार्गाला लावा.
Trending Now