राष्ट्रीय पक्ष कोणताही घ्या सगळीकडे मराठी आणि मराठा माणूस धरूनच राजकारण सुरू असते. मराठी मतांसाठी मराठे पदाधिकारी निवडून आपापसात भांडणे लावायची कामे केली जातात. ही त्या पक्षांची धोरणे असतात आणि आम्ही मराठे भांडून मरतो हे त्यांच्या ध्यानात येत नाही, राष्ट्रीय पक्षातल्या मराठ्यांनी सावध होण्याची हीच वेळ आहे.
बेळगाव उत्तर,दक्षिण, ग्रामीण, खानापूर आणि निपाणी एवढ्या मराठी संख्या जास्त असलेल्या मतदारसंघाचा विचार करा, सगळीकडे मराठी मते पडल्याशिवाय निवडून येणे कठीण आहे, मात्र उमेदवारी दिली जाते जैन किंवा लिंगायत व्यक्तीला, समितीतून फुटून गेलेले आम्ही मराठे त्या स्वतःला हिंदूही न मानणाऱ्या उमेदवारासाठी जीव तोडून काम करतो, मराठी भावनांशी प्रतारणा करतो आणि शेवटी काय मिळते? विचार करायची गरज आहे.
सर्व राष्ट्रीय पक्षांनी या पाच मराठी मतदारसंघात मराठी आणि मराठा उमेदवार देण्याचा विचार का करू नव्हे? आजपर्यंत असे झालेले नाही मग तिकीट मिळत नसेल तर आपसात भांडून काय मिळणार? जे स्वतः मराठीचा द्वेष करतात त्यांचा प्रचार करून तुम्ही दिवस घालवत बसणार असाल तर तुमचे जीवन व्यर्थ ठरेल.
तुम्ही खरेतर सगळे मराठी भाषिक एक होऊन मराठी बहुसंख्य भागात मराठीला उमेदवारी द्या म्हणून भांडायला पाहिजे, बेळगाव दक्षिणेत भाजपचा उमेदवार मराठा झाला तर कुणाचा फायदा होईल याचा विचार करा, काँग्रेस ने उत्तर आणि दक्षिण तसेच ग्रामीण मध्ये मराठा उमेदवार का देऊ नव्हे? खानापूर आणि निपाणीतली मराठी मते पाहिजेत, पण उमेदवार मराठी नको हा कुठला न्याय, फक्त मराठा क्रांती होऊन कामाचे नाही ही क्रांती पक्षांच्या कुटील कारभारविरोधात उफाळून आली तरच आपला समाज पुढे जाईल नाहीतर दुसऱ्या उमेदवाराचे पोष्टर बॉईज होण्यापलीकडे तुमच्या हातून काहीच होणार नाही.राष्ट्रीय पक्षांनी मराठ्यांचा फक्त वापर करून घेतलाय समिती शिवाय मराठी माणसाला पर्याय नाही हे कधी कळणार?
सध्या बेळगाव भाजपात उमेदवारी साठी मराठ्यातुन संघर्ष सुरू झालाय एकमेकविरोधात कुरघोड्या सुरू आहेत.भाजपातल्या मराठा नेत्यांनी समितीशी द्रोह करून ज्यांना आपल घर निवडणुकीची यंत्रणा चालवायला दिल, मराठी मतं मिळवून दिली आमदार केलं मोठं केलं तेच लोक मराठा नेतृत्वात तंटा लावून आपला फायदा करून घेऊ पहात आहेत त्यामुळे मराठे कधी शहाणे होणार की एकमेकातच भांडून दुसऱ्याचा फायदा करणार हा मुख्य प्रश्न आहे.
प्रत्येक पक्षात जातीला पुढं करून तिकीट वाटप होतो ज्या त्या मतदार संघातील जातीय गणितानुसार तिकीट दिले जाते बेळगावतही मराठ्यांचं प्राबल्य आहे मग इथे तिकीट मिळवण्यात मराठे का मागे ?याचा विचार झाला पाहिजेत म्हणूनच तुलनेत मराठा पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्यांना फायदा करून देणे म्हणजे ‘मराठा’ या शब्दाची आत्महत्या ठरेल मराठा माणसा जागा हो म्हणण्याची वेळ आली आहे.
तुम्हाला समिती पटत नाही, तुम्ही राष्ट्रीय पक्षांच्या विचारधारेचे आहात, तुम्हाला कर्नाटक महाराष्ट्र भेद करायचा नाही, भाषिक वादात तुम्ही पडत नाही, असे असतानाही तुम्हाला राष्ट्रीय पक्ष तिकीट देत नाहीत यावरून मराठा सत्ताधारी होणे त्यांना पटत नाही हेच दिसून येते, मग एक करा एकी करून तिकिटे मिळवा नसेल तर त्या पक्षाचे अपमान सोसत पडून ऱ्हावा, मराठा किंवा मराठी म्हणून घेण्याचा अधिकार गमावून शांत बसा.