कर्नाटकात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच एकीकडे सर्व राष्ट्रीय पक्षांनी आपल्या प्रचाराची मोर्चेबांधणी चालवली असतानाच बेळगावात एका जैन मुनींनी आपल्या धर्मातील दोघांना निवडून आणण्याचा विडा उचलला आहे.
यापूर्वी कर्नाटकात एका राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार निवडणून यावा यासाठी लिंगायत धर्मातील मठाधिश आणि स्वामींनी निवडणुकीत प्रचार करत आपला उघड पाठिंबा दिला होता याच पावला वर पाऊल ठेऊन जैन मुनीनी देखील आपले प्रयत्न चालू ठेवले आहेत. वास्तविक एखाद्या धर्मगुरूंने राजकारणात सक्रिय असता कामा नये असा एक संकेत आहे पण राजकीय सत्तेशिवाय समाजात कुणाला स्थान नाही हे ओळखून जैन मुनींनी बेळगावतल्या राजकारणात आपल्या समाजातील दोघांना उघड पाठिंबा देऊन त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे त्यामुळं हा चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबईतील मीरा भायंदर महा पालिका निवडणुकीत सामना संपादक शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि जैन मुनीं नयनपदम सागर महाराज यांच्यात बराच कलगीतुरा रंगला होता .या निवडणुकीत जैन मुनीं नयनपदम सागर महाराजांनी भाजपला मतदान करा शिवसेनेला पराभूत करा असा उघड प्रचार करून आवाहन दिल होता ही घटना ताजी असताना बेळगावात मुनींनी आजी माजो आमदारांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
राष्ट्रीय पक्षांना जनाधार कमी झाल्याची भीती वाटत असल्याने थेट आता धर्मगुरूंना साकडं घालून निवडून येण्याची कसरत सुरू आहे.लिंगायत धर्मातील अधिक आमदार निवडून यावेत यासाठी राष्ट्रीय पक्ष कामाला लागला असून मुख्यमंत्री देखील आपल्याच धर्माचा व्हावा असाही त्यांचा आग्रह राहिला आहे त्यामुळं साहजिकच जैन मुनींना देखील आपल्याच धर्माचे आमदार अधिक निवडून यावेत असे वाटणे काही गैर नाही.
या सर्व घटना घडत असतानाच एका आमदारांनी जयपूर गाठलं असून तरुणसागर महाराजांचा आशीर्वाद घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे राजकीय नेत्यांनी जनाधार प्राप्त करण्यासाठी,आशीर्वाद घेण्यासाठी मुनीं साधू मठाधिश स्वामींची संपर्क वाढवला आहे.