बेळगाव ग्रामीण मध्ये सध्या वातावरण गढूळ झाले आहे. दोन नेत्यांच्या वादात मागील दोनवेळा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नुकसान झाले आहे. यावेळी या वादाचाच परिणाम पुन्हा होण्याची शक्यता आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जय महाराष्ट्र म्हणण्याचे राजकारण झाल्यानंतर पुन्हा एकदा समिती नेत्यांनी शहाणे होण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव तालुका हा पूर्वीपासून समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र वैयक्तिक स्वार्थाच्या राजकारणात या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचेच काम येथील समिती नेते आणि यांच्यापाठोपाठ त्यांचे कार्यकर्तेही करू लागले आहेत, यामुळेच राजकीय पक्ष तालुक्यात सक्रिय होत असून मतांच्या विभाजनाचा फायदा त्यांना होऊ लागला आहे.
मागील दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने याचा फायदा घेतला आहे. मागील विधानसभेवेळीतर अनपेक्षितपणे भाजपचा विजय झाला आहे. माजी आमदार मनोहर किणेकर आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या वादाने ही वेळ निर्माण झाली आहे. सध्या सुंठकर भाजपच्याच मार्गावर असल्याच्या बातम्या आहेत आणि किणेकर यांच्या विरोधात नाराज गट तयार झाला आहे. किणेकर यांना तिकीट दिल्यास आम्ही काँग्रेस कडे जाऊ अशी घोषणा काही कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे सर्वसामान्य सिमवासीयांचे काय होणार हा प्रश्नच आहे.
सिमावासीयांचे नेते किरण ठाकूर यांनी दोघांनाही फेकून द्या आणि तिसरा उमेदवार आणा अशी सूचना केली आहे. त्यानंतर पर्यायी इच्छूकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या इच्छूकात जी प सदस्य सरस्वती पाटील, माजी आमदार प्रभाकर पावशे यांचे पुत्र मनोज पावशे, बांधकाम कंत्राटदार एस एल चौगुले, एपीएमसी सदस्य तानाजी पाटील, वकील सुधीर चव्हाण, भागोजी पाटील, लक्ष्मण होनगेकर तसेच रामचंद्र मोदगेकर यांचा समावेश आहे.
ग्रामीण मध्ये होणार तीव्र विरोध किणेकर यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत, यामुळे त्यांनी दक्षिण मतदार संघात आपले हातपाय मारण्यास सुरवात केल्याची माहिती आहे. ग्रामीण च्या कॉंग्रेस च्या संपर्कातील गटात नाराज गटात सध्या चेतक कांबळे, कल्लेहोळ चे संजय पाटील, महेश डुकरे, एस एम बेळवटकर, यल्लप्पा बेळगावकर, सिध्दाप्पा छत्रे यांचा समावेश आहे.
मध्यवर्ती समितीने ही नाराजी दूर न केल्यास त्याचा मोठा फटका बसणार आहे.