आजारी असतानाही बिदर जिल्ह्यातून बेळगावला बंदोबस्तासाठी पाठवण्यात आलेल्या एका पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी उजेडात आली आहे. प्रकृती बिघडून खोलीतच तो दगावला होता याची पोलीस दलाला खबरच नव्हती, तब्बल तीन दिवस त्याचा मृतदेह एका खोलीतच पडून होता दुर्गंधी आल्याने कार्यकर्त्यांनी पाहिले असताना ही शोकांतिका समोर आली.
.प्रकाश असे त्याचे नाव आहे. बिदर जिल्ह्यातल्या धननुर पोलीस स्थानकात तो कार्यरत होता. त्याची प्रकृती ठीक नव्हती यामुळे आपण बंदोबस्ताला जाऊ शकत नाही असे त्याने आपल्या वरिष्ठांना सांगितले होते. तरीही त्याला बेळगावला पाठवण्यात आले होते. येथे आल्यावर गांधीनगर च्या मागील बाजूस असलेल्या मारुती नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात त्याला नेमण्यात आले होते. त्याची अवस्था पाहून मंडळानेच त्याला राहण्याची व्यवस्था करून दिली होती.
तो आजारी असल्याने जास्तीत जास्त वेळी खोलीत झोपून राहत होता. यामुळे कार्यकर्त्यांनीही त्याला त्रास होऊ नये याची काळजी घेतली होती. मंगळवारी जेवण करून गेल्यानंतर तो परतला नाही. आज त्या खोलीतून दुर्गंधी आल्याने शेजारील महिलेने कल्पना दिली आणि हा प्रकार उजेडात आला आहे.
माळमारुती पोलीस स्थानकाच्या उपस्थितीत पंचनामा करून दरवाजा फोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
बंदोबस्ताचा आढावा घेणाऱ्या पोलिसांनाही हा प्रकार कसा लक्ष्यात आला नाही की मागील तीन दिवसात या भागात पोलिसांचा राऊंड झालाच नाही याचाही शोध घेण्याची गरज आहे. त्याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे