आरपीडी चौकातले पर्यावरण पूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
गणेशोत्सव म्हटला की धामधूम आलीच. सार्वजनिक उत्सवात एकाला दहा कार्यकर्ते आले, मतभिन्नता आली की काय काय होते ते सगळ्यांनाच माहिती असते, मात्र आरपीडी चौकातले मंडळ याला अपवाद आहे. कोणी पदाधिकारी नाही सगळेच कार्यकर्ते या हिशोबाने या मंडळाने ५९ वर्षांची उज्वल वाटचाल केली आहे.
या मंडळाचे यंदा आकर्षण असेल म्हणजे सोलारवर केलेली सजावट. मंडप उभारणी झाल्यावर त्यावर सोलार पॅनल बसवून तयार होणाऱ्या सूर्य ऊर्जेवर हे मंडळ सारी सजावट करणार आहे. समीर पाटील या इंजिनीयर तरुणाने ही कल्पना पुढे आणली आहे.
हे मंडळ आरपीडी चौकातल्या व्यापारी आणि युवकांचे आहे. येथे वैयक्तिक मानसन्मान आणि हेवेदावे करत नाहीत, सगळे एक समान म्हणूनच ते काम करत आलेत, ही कौतुकाची गोष्ट आहे, पदे घेऊन मिरवण्याची सवय लावून न घेता त्यांचे काम सुरू आहे.
या गणेश मंडळा कडून पर्यावरण प्रदूषणाचा विचार करत फटाके आणि डॉल्बी विरहित गणेश उत्सव साजरा केला जातोय या शिवाय अनेक सामाजिक प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रम,भजन वगैरे आयोजित केली जातात.डॉल्बी फाटा देत झांज पथक असते.
पी ओ पी चा वापर नाही
गेली सहा वर्षे कायमस्वरूपी फायबरची दहा फूट उंच गणेश मूर्ती साकारली जात आहे पी ओ पी चा वापर टाळण्यासाठी फायबर ची मूर्ती दर वर्षी बसविण्यात येते पूजे साठी एक फुटी लहान शेडू ची मूर्ती बसविली जाते अन केवळ लहान मूर्तीच विसर्जन केले जाते. विसर्जनासाठी हे मंडळ मुख्य मिरवणुकीत सामील होत नाही तर आदर्श आरकेड मधील छोट्या विहिरीत छोटी मूर्ती विसर्जित केली जाते तर फायबर ची मूर्ती पुढील वर्षी साठी तशीच ठेवण्यात येते.एकूणच आर पी डी कॉर्नर वरील हे गणेश मंडळ पर्यावरण पूरक मंडळ म्हणून समोर येत आहे.
माजी महापौर जेष्ठ नगरसेवक किरण सायनाक,सचिन चव्हाण,श्रीराम शिंदे,महावीर हुली,जयंत पुजारी सुरेश कल्लापन्नावर,संदीप रोकडे आदी मंडळाचे पदाधिकारी आहेत.