महिला सबल झाल्या पाहिजे अस सर्वांनाच वाटत. पण, त्यासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. एका विशिष्ट चौकटीतच स्रीच जगण आजही सुरू आहे. मात्र , स्रियांसाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय तो बेळगाव मधील महिला आघाडीनं.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीच्या वतीने नरगुंदकर भावे चौकात बारा स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झालाय. महिलांच्यात आत्मविश्वास वाढायचा असेल तर तिला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे . हीच गरज ओळखून महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी महिलांच्या हाताला आधार देण्याच काम सुरू केलय. यासाठी किल्लेकर स्वतः कडच परतीच्या अटीवर भांडवल देऊन त्यांच्या पदरात रोजगार उपलब्ध करून दिलाय. या स्टॉलना जागा भाडं नाही इतर सर्व खर्च महिला आघाडीच उचलणार आहे.
लायटिंग माळ, कागदी डेकोरेशनच साहित्य ,थर्मोकोलचे मंदिर , फराळ ,पूजेचे साहित्य अशा सगळ्या वस्तू या स्टॉलमधून ठेवण्यात आल्या आहेत. कंग्राळ गल्ली एकता महिला मंडळ, स्त्री शक्ती महिला मंडळ पांगुळ गल्ली,शास्त्री नगर महिला मंडळ, राजमाता महिला मंडळ भोई गल्ली, एकमत महिला मंडळ कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली महिला मंडळ, वैयक्तिक स्वरूपात काही महिलांना हा रोजगार या उत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. महिला एखादा व्यवसाय अतिशय जिद्दीन आणि चिकाटीनं करतात त्यांना थोडीशी प्रेरणा मिळाली की त्या व्यवसायात पाय रोवतात. असा पक्का विश्वास रेणू किल्लेकरांना असल्यामुळे त्या या महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी धडपडत करत आहेत.
या अगोदर महिला आघाडीनं भोजनालय सुरू करून तिथेही महिलाना रोजगार दिलाय. एका विशिष्ट ध्येयानं आपण काम करत राहिल्यास आपल्या सोबत इतरांनाही पुढे नेता येत हेच या वेगळ्या प्रयोगातून दिसतय त्यांच्या या धडपडीला समाज नक्कीच साथ देईल.