सरकारी कार्यालयावर तिरंग्या सह फडकणारा लाल पिवळा ध्वज हटवा अशी केंद्रीय गृह मंत्र्यांकडे मागणी करणाऱ्या मराठी भाषिक युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज कणबरकर याने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालया वरील लाल पिवळा ध्वज हटवा अशी पत्र लिहून मागणी केली होती याची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने कालच कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणी योग्य ती कारवाई करा अस आश्वासन दिलं होतं.
या मुळे पित्त खळवळलेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार करून पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. कन्नड भाषे विरोधी कृत्य करणे तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाला चुकीची माहिती देणे असा ठपका समिती कार्यकर्त्यावर ठेवण्यात आला आहे.
कन्नड संघटनेचे दीपक गुडगेनट्टी यांनी मार्केट पोलिसात दिलेल्या फिर्यादी नंतर गुन्हा नोंद करण्यात आलाय. दोन भाषिकात तेढ निर्माण करणे आय पी सी 153 अ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्र्या विरोधात फेस बुक वर पोस्ट टाकल्या चा देखील आरोप सूरज कणबरकर वर ठेवण्यात आला आहे.
राज्य सरकारने लाल पिवळ्या ध्वजास अध्याप अधिकृत मान्यता दिली नसताना सरकारी कार्यलयावर राष्ट्र ध्वजा सोबत फडकणारा बेकायदेशीर ध्वज हटवा अशी मागणी करणे कितपत चुकीचं आहे असा प्रश्न विचारला जात आहे.