बेळगावात कोणतेही आंदोलन असो समोर रिक्षाने सूचना देण्याची पद्धत आहे. हे आंदोलन मराठी भाषिकांचे असेल तर नक्कीच त्या रिक्षात असतात…. महादेवराव पाटील. आपल्या भरभक्कम आणि कोणत्याही माईक शिवाय हजारो लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचणाऱ्या आवाजातून ते घोषणा आणि सूचना सुरू करतात. हे आजकाल नव्हे तर अनेक दशके सुरू आहे, म्हणूनच सगळेच मानत आलेत मोर्चा आंदोलन शिस्तीत व्हायचे असेल तर गरजेचा आहे एकच आवाज महादेव पाटील.
आज त्यांचा वाढदिवस, या निमित्त त्यांच्या एकूण कामाची दखल घेऊन बेळगाव live ने त्यांना आठवड्याचा माणूस बनविले आहे.
महादेव पाटील हे एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेले कार्यकर्ते. त्यांचे कार्य सुरू झाले ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनातून. हुतात्मा दिन , काळा दिन, वेगवेगळे सत्याग्रह आणि मुंबई दिल्ली वाऱ्यांमधून त्यांचा तरुणपणीच कार्यकर्त्यांचा प्रवास सुरु झाला. याच काळात त्यांची ओळख कॅमेऱ्याशी झाली आणि प्रत्येक आंदोलनाचे फोटो साक्षीदार म्हणून इतिहास जपण्याचे त्यांचे काम सुरू झाले. ते आजही अविरत सुरू आहे, महादेवराव एक चांगले छायाचित्रकार आहेत, हे काम व्यावसायिक कारणासाठीही त्यांनी सुरू केले, कारण आंदोलनात घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्या लागतात. त्यांना असे अनेक अनुभव आले आहेत, राब राबून आमदार करायचे आणि पुढे त्याने साथ सोडायची असे अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत, यामुळे महादेवराव स्वतः कमावतात आणि अस्मिता म्हणून आंदोलनात सहभागी होतात, कुणाच्या जीवावर ते जगत नाहीत.
गणेश उत्सवात सार्वजनिक गणेश महा मंडळाचं अर्ध्याहुन अधिक कार्य ते लीलया एकटेच पेलतात कोण येवो न येवो गणेश महामंडळाचं त्यांचं कार्य सुरूच असतंय
सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग मोठा आहे. जायंट्स ग्रुप च्या माध्यमातून विविध पदांवर काम करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. सगळ्यांसाठी नेहमी हाकेला हजर असणारे, सीमाप्रश्नाची प्रत्येक गोष्ट आपल्या सुंदर मराठीत महाराष्ट्रात पोहोचविणारे आणि काय करणार दिवस चांगले येतील म्हणत राबत राहणारे महादेवराव ग्रेट माणूस आहेत.
Happy birthday mahadev Patil saheb