हां आम्ही तुम्हाला भाऊ म्हणालो आणि म्हणणारच. कारण आम्हा सीमावासीयांचा महाराष्ट्र हा मोठा भाऊ आम्ही मानतो. त्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे तुम्हीही आमचे दादा च झालात. तुम्ही आतातरी महाराष्ट्र तोडण्या ऐवजी तो जोडण्याचा विचार कराल या अपेक्षेने आम्ही बेळगाव live च्या वतीने तुम्हाला हे पत्र लिहीत आहोत.
तर मराठा क्रांती मोर्च्यातील १४ वी मागणी ‘सीमाप्रश्ना’ संदर्भात होती. हे तुम्ही वाचलेच असेल. मुंबईत जो कोट्यवधी मराठ्यांचा भव्य क्रांती मोर्चा झाला त्यात आम्ही सीमावासीयही सहभागी होतो हे ही तुम्हाला माहित असेल अशी आशा करतो. मात्र या मोर्चाला उद्देशून तुम्ही जे पत्र दिले ते वाचले तर तुम्हाला या मोर्चातील सीमावासीयांच्या भावनेची काही कदर असेल असे वाटत नाही, म्हणूनच हा लेखन प्रपंच करावा लागतोय.
माननीय मुख्यमंत्री म्हणून आपण जे निवेदन दिलं त्याची लिखित प्रत मिळाली. त्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख देखील नाही.
किमान संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राण दिलेल्या हुतात्म्यांचा तरी आदर राखावा हि विनंती. आम्ही आज करू इच्छितो.
हेचि फळ काय मम् तपाला
असा प्रश्न पडण्याचीच वेळ देवेंद्र भाऊ, दादा किंवा सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आमच्यावर आणून दिली आहे. दिल्लीतल्या नरेंद्र भाऊंच्या तुम्ही खास मर्जितले आहात. त्यांना धरून स्वतंत्र विदर्भाच्या तयारीसाठी तुम्ही केलेले प्रयत्न आम्ही पाहिले आहेत. आम्ही महाराष्ट्र जोडायला निघालोय, म्हणूनच तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहात काय? असा प्रश्न आमच्या मनात सतावत आहे.
मराठा क्रांती मोर्चाने एकूण १५ मागण्या मांडल्या होत्या, त्यात आमची १४ वी मागणी होती, तीही मागणी मराठी आणि मराठ्यांचीच होती तिच्याकडे असा कानाडोळा करू नका हीच आमची मागणी आहे.