पुढील आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात कर्नाटक राज्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्य मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.कर्नाटकात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन भाजपचे हायकमांड राज्याला अधिक मंत्रिपदे देण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सध्या अनंतकुमार,सदानंद गौडा आणि रमेश जिगजिनगी असे तीन कर्नाटकचे मंत्री आहेत.मंत्रिमंडळात आणखी तिघाना पुढील विस्तारात संधी मिळणार असल्याने हा आकडा अर्धा डझन होऊ शकतो.राज्यमंत्री पदासाठी बेळगावचे राज्य सभा खासदार प्रभाकर कोरे आणि खासदार सुरेश अंगडी यांच्या नावांची चर्चा जोर सुरु होती पण गेल्या काहीं दिवसांत दोघांची नावे मागे पडली आहेत.
बेळगावातील खासदार द्वयी पैकी एकास लिंगायत कोट्यातून राज्यमंत्री पद मिळेल अशी शक्यता होती मात्र सध्या तरी दोघांची नावे मंत्रीपदाच्या शर्यतीतुन मागे पडली आहेत.अंगडी सध्या लिंगायत समाजाच्या मोर्चावरून केलेल्या वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत.तर कोरे ग्रास रूट लेव्हल नेते नसल्याने त्यांना मंत्रीपद हुलकावणी देण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रीपदासाठी शोभा करंदलाजे आणि बी. श्रीरामलू यांची वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.राज्यातील एस टी मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेळळारी खासदार श्रीरामलू यांना कॅबिनेट मंत्री देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.