बेळगाव ग्रामीण मतदार संघात दोन नेते समिती विकण्याच्या मार्गावर आहेत. अर्धा भाग भाजपला आणि अर्धा भाग काँग्रेसला अशी दोन भागात ही विक्री होणार असल्याच्या मार्गावर आहे. पैसे आणि पद या लढाईत मराठी अस्मितेला गहाण ठेवायचा हा प्रकार आवरायला पाहिजे. सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची मानसिकता मध्यवर्तीत नसल्याने ही विक्री शक्य होईल अशी चिंता आहे.
दोन्ही नेत्यांची पदाची आशा, बंडखोऱ्या, काँग्रेस भाजपचे पैसे वाटणे, सामाजिक प्रश्नात त्या पक्षतील नेत्यांसोबत आंदोलन करणे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे या हळुवार कामातून विक्रीची पूर्वतयारी सुरू आहे. मला तिकीट द्या नाहीतर जातो अशी धमकी देऊन हे नेते राजकारण करत असताना सामान्य तरुण कार्यकर्तेही राजकीय नेत्यांच्या मागे लागत आहेत. अनेक वर्षे बांधून ठेवलेली मोट फोडायचा प्रकार सुरू झाला आणि हे सारं स्वार्थासाठी सुरू आहे.
सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात असताना बालेकिल्ला ग्रामीण मतदारसंघ असा फुटून विकला गेला तर नुकसान होणार. आजवर शहरातले फुटले तरी ग्रामीण अभेद्य होता, बंडखोरी सुरू झाली, नेतेच राष्ट्रीय पक्षांचे पैसे वाटू लागले यामुळे तरुणांनाही चटक लागत आहे, नेते गड गन्ज होतात तर आम्ही मागे का ही भावना सुरू झाली आहे. याकडे विचार व्हायला पाहिजे. शहर समितीतील विस्कटलेली घडी एकत्रित होत आहे दिवसेंदिवस शहरात समिती बळकट होत आहे मात्र ग्रामीण मध्ये उलटी परिस्थिती असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.
एकीकडे ग्रामीण मतदार संघात विध्यमान आमदार समितीतील बेकी मूळ कधी नव्हे तेवढा कामाला लागलाय जन संपर्काची निवडणुकीच्या तोंडावर आठवण काढत आहे तर दुसरीकडे कर्नाटकात सत्तारूढ राष्ट्रीय पक्षातील दिगग्ज महिलेने समितीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेत्यांना गळ टाकला आहे अनेक समिती कार्यकर्ते संपर्कात आहेत गावागावांत हळदी कुंकू कार्यक्रम साडी वाटप सुरू आहे मात्र समितीचे नेते सामना जिंकण्याचा विचार करण्याऐवजी दोन्ही गटातून कस भाजप आणि काँग्रेस ला मदत होईल हेच प्रयत्न करताना दिसत आहेत. अजूनही वेळ गेलेलो नाही सीमा लढ्याच्या हुतात्म्याची शपथ एक व्हा ….जोमाने कामाला लागा…हे सांगण्याची वेळ आली आहे.
मार्गदर्शक नेत्यांनी तळात काय चालले आहे याचा विचार करून मार्ग काढायची गरज आहे. एक एक कार्यकर्ता जर फुटला तर समितीच काय याचा विचार करा आणि स्वार्थ आवरा नाहीतर ही फितुरी महागात पडेल, यात शंका नाही.