मूर्ती लहान पण कीर्ती महान असे केवळ लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबत म्हटले जायचे मात्र बेळगावात देखील अस एक व्यक्तिमत्व आहे कि त्यांना देखील मूर्ती लहान पण कीर्ती महान अस म्हणायला हरकत नाही .ते व्यक्तिमत्व म्हणजे राम आपटे हे बेळगावचे न्यायांग आहेत .१९२६ साली जन्मलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनलेले, पुढे सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय झालेले, कामगारांच्या पाठीशी कायद्याची ताकत उभी केलेले आणि वयाच्या ९१ व्या वर्षीही त्याच तळमळीने काम करत राहणारे बेळगावचे हे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच बेळगाव live ने त्यांना आठवड्याचे व्यक्तिमत्व बनवले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात जो सीमाप्रश्नाचा खटला सुरू आहे त्याचा पाया राम आपटे सर आहेत. पहिला दावा त्यांनी दाखल केला तेंव्हा म ए समितीने त्यांना लागणारी रक्कम जमा करून दिली होती, पुढे तो खटला आणि एकंदर जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आणि आपटे यांचे पैसे परत केले, ते पैसे आपटे यांना गुपचूप ठेऊन घेता आलेही असते मात्र त्यांना ज्या नेते आणि कार्यकर्त्यांनी ते जमवून दिले होते त्यांच्याकडे सोपवून त्यांनी आपली पिढीजात प्रामाणिकतेची परंपरा जोपासली.
आजही आपटे यांच्या सल्ल्यानेच सीमाप्रश्नाची खटल्याची कामे चालतात. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्या संपर्कात असतात, २४ जुलै ला होणाऱ्या सीमाप्रश्नी सुनावणी पूर्वी दिल्ली येथे जाऊन महाराष्ट्राच्या वकिलांसोबत महत्वपूर्ण बैठकीत ते सहभागी होणार आहेत.
आपटे यांचे काम मोठे आहे, गांधीजींनी छोडो भारत चा नारा दिला तेंव्हा ते मॅट्रिकला होते, शिक्षण अर्धवट सोडून ते देशभक्तीच्या वाटेवर गेले, ही चळवळ थांबल्यावर पुन्हा बेळगावला येऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.१९४२ पासून १९५५ पर्यंत ते राष्ट्रीय सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते, १९४६ पर्यंत स्वातंत्रलढ्यात कार्यरत राहताना डॉ राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते होते. गोवा मुक्ती संग्रामतही त्यांचा सहभाग होता, गोवा विमोचन समितीचे ते सेक्रेटरी होते. १९६१ ला गोवा भारतात विलीन होईतोवर त्यांनी लढा दिला आहे.
१९५५ पासून ते महाराष्ट्र एकीकरण समितीत कार्यरत आहेत. अनेक वर्षे समितीचे सचिव पदी त्यांनी काम केले आहे. सारबंदी आणि सीमासत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना तीन वेळा कारावास भोगावा लागला. १ वर्षाहून अधिक काळ त्यांनी सीमाप्रश्नासाठी कारावासाची हवा खाल्ली आहे.
१९४२ पासून ते राजकारणात सक्रिय होते. सुरवातीला काँग्रेस, त्यानंतर समाजवादी, प्रजा समाजवादी आणि जनता पक्षाच्या राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग होता. १९८० नंतर त्यांनी पक्षीय राजकारणातून निवृत्ती घेऊन आपली सामाजिक जबाबदारी पुढे निभावली. ट्रेड union चे आजतागायत सक्रिय कार्यकर्ते आहेत, अनेक चळवळी उभारून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अन्याय निवारण मंच, भ्रष्टाचार निर्मुलन समिती च्या माध्यमातून मागील ६० वर्षे ते काम करत आलेत. हिंसा, अन्याय, अत्याचार तसेच सामाजिक आणि आर्थिक समस्या निवारण्यासाठी जीवन विवेक प्रतिष्ठान ची स्थापना त्यांनी स्वतः केली आहे. या माध्यमातून त्यांचे काम जोरात सुरू आहे.
महानगरपालिकेच्या स्वयंघोषित कर पद्धतीला सर्वप्रथम विरोध राम आपटे यांनीच केला.सलग ९ वर्षे लढत राहून त्यांनी ही करपद्धत मागे घ्यायला लावली व लाखो लोकांना न्याय मिळवून दिला. आपटे आजही कुणावर अन्याय झाला की पेटून उठतात आणि न्याय मार्गाने लढतात.
अन्यायकारक रुंदीकरण असो किंवा येळ्ळूर ला झाली तशी मारहाण ते स्वतः मानव हक्क आयोगाकडे जाऊन लढतात. त्यांनी स्वतः अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.सिमा प्रश्नावरील त्यांची अभ्यासू पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते देवाला मानत नाहीत मात्र त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि अन्याय झाला की त्यांच्या आतील बुलंद आवाज असाच बाहेर येत राहो हीच बेळगाव live ची प्रार्थना.