Thursday, November 21, 2024

/

चंदीगड दौरा जनतेच्या पैश्याची उधळपट्टी – प्रशांत बर्डे

 belgaum

बेळगाव महा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला अभ्यास दौरा हा कन्नड भाषेतील म्हण “यारादरे दुड्ड यल्लम्मन जात्रे” या प्रमाणेच आहे . केंद्र सरकारने वादग्रस्त अश्या बेळगाव शहरास स्मार्ट सिटी चा दर्जा दिलाय. यासाठी  आधीच केंद्र सरकारने ४०० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीवरील व्याज देखील तब्बल ४० लाख रु पालिकेच्या खात्यावर जमा झालेत स्मार्ट सिटी च्या प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी प्राथमिक तयारी सुरु आहे. नियोजित वेळेत हा स्मार्ट प्रोजेक्ट पूर्ण होणे गरजेचे असताना हे काम अर्धवट टाकून चंदिगड अभ्यास दौरा आयोजित केल्याने त्यावर सार्वत्रिक टीका होत आहे.

पालिकेच्या वतीने या पूर्वी निश्चित झालेले अहमदाबाद आणि मैसूर हे दौरे शासनाने परवानगी न दिल्याने रद्द करण्यात आले होते तर पुणे दौऱ्यात काही मोजक्याच नगरसेवकांना याचा लाभ उठवता आला होता.या रद्द झालेल्या दोन दौऱ्यामुळे नगरसेवकातील खदखदत असलेला असंतोष दूर करण्यासाठी आता सर्व ५८ नगरसेवकांचा चंदिगड अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

केवळ अभ्यासाचं निमित्त पुढे करून दौरा आयोजित केल्याचे समोर येत आहे मात्र या दौऱ्याचा उदेश्य वेगळाच आहे यापूर्वी हि अनेक दौरे आयोजित केले होते माजी महापौर वंदना बेळगुंदकर यांच्या कार्यकाळात काश्मीर दौरा आयोजित केला होता यात निवडक नगरसेवक गेले होते त्या अनेक दौऱ्यांचा अनुभव साऱ्यांनाच आहे त्यामुळे चंदिगड दौऱ्याने नगरसेवक काय दिवे लावणार आहे अश्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .

अलीकडेच स्थायी समित्यांच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत मराठी भाषिक नगरसेवकांनी अस्मिता गुंडाळून जे  प्रदर्शन केलं त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असताना हा दौरा आयोजित करणे म्हणजे आम्ही विकासाभिमुख आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.या सर्व घडामोडी लक्षात घेता मराठी भाषिकांची सत्ता असलेल्या बेळगाव महा पालिकेत मराठी गटाची अवस्था A ship without radar (दिशा नसलेला जहाज) अशीच झाली आहे.

आज कोणीही काहीही म्हटलं तरी या कन्नड आणि उर्दू गटाला स्थायी समित्या बहाल करण्याच्या आत्मघातकी प्रवृत्तीला सर्वच मराठी भाषिक नगरसेवक जबाबदार आहेत . आता प्रत्येकजण आपल्या अंगावरील झूल दुसऱ्याच्या अंगावर टाकून मी किती स्वच्छ आहे माझी मराठी निष्ठा अधिक तीव्र आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा प्रश्नाच्या ठरावाची परंपरा खंडित केलेल्या बेळगावातील मराठी नगरसेवकांना जनता चांगलीच ओळखून आहे . पालिकेने आयोजित चंदिगड दौरा  बेळगावातील जनतेने कर रूपाने भरलेल्या पैश्याची उधळपट्टी ठरणार हे मात्र निश्चितच ..

लेखन- प्रशांत बर्डे ,जेष्ठ पत्रकार ,बेळगाव.

मोबईल- ०९३४२२९११३९

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.