बेळगाव शहर स्मार्ट सिटी बनत आहे. ते प्रत्यक्षात की कागदावर हे विचारू नका! या स्मार्ट शहरात सगळेकाही स्मार्ट आहे, रस्ते स्मार्ट, त्यावरील खड्डेही तितकेच स्मार्ट, अशाच एका स्मार्ट खड्ड्यात पोलीस जीप अडकते तेंव्हा…. काय मजेशीर घटना आहे नाही? वाचा तर मग त्या अडकलेल्या जीप ची स्मार्ट कथा.
बुधवारी सकाळची ११ ची वेळ. खडेबाजारातून एक पोलीस जीप चाललेली. ती जीप मन्नूरकर गल्लीच्या कोपऱ्यावर येते, आणि अचानक जीप च्या डाव्या बाजूचे समोरचे चाक धाडकन त्या स्मार्ट खड्ड्यात अडकते.
तंद्रीत जीप चालवणारा तो पोलीस चालक जागा होतो. मला कोणीतरी मदत करा असा धावा करतो. मात्र त्या खड्ड्यात अडकणार्या वाहनांची सवय झालेले नागरिक नेहमीप्रमाणे बघत राहतात. कारण त्यांच्यासाठी ही नित्यनेमाची गोष्ट असते. शेवटी कोणतरी मदत करतो, धक्का दिला जातो आणि ती जीप ही निघून जाते.
जीप पोलिसांची अडकली म्हणून बातमी होते. मागील ५ ते ६ महिने या खड्ड्यात कितीतरी स्मार्ट गाड्या अडकून मोडल्या तर कोण लक्ष देत नाही याची चर्चा होते.
स्मार्ट बेळगावातील त्या स्मार्ट खड्ड्याची आता विक्रमी वाटचाल सुरू असल्याची दखल घेऊन पालिका आयुक्त त्या खड्ड्याला काही पुरस्कार वगैरे देतील अशी आशा अनेकजणांना वाटत आहे.
बेळगाव शहर स्मार्ट कसं होणार अधिकारी कधी स्मार्ट बनणार हेच पहावं लागणार आहे.