आजकाल सगळीकडेच जय महाराष्ट्र चा गजर सुरू आहे. मंत्री रोशन बेग यांनी लावलेली ठिणगी चांगलीच पेट घेऊ लागली आहे. मरगळ आलेल्या सीमाप्रश्नाला बळ देण्याचे काम करणाऱ्या बेग यांचे आभारच, मात्र जय महाराष्ट्र वरील त्यांचा पोटशूळ आणि त्यातून भडकलेल्या महाराष्ट्राचे परिवर्तन मंत्री दिवाकर रावते यांच्यामुळे एसटी चा जुनाट लोगो नवा झाला व त्यावर जय महाराष्ट्र झळकले.आता जय महाराष्ट्र च्या बस देशभर तोऱ्यात फ़िरतील, कर्नाटकात हा तोरा नक्कीच वाढलेला असेल.
बेळगाव आणि सीमाभागात मात्र पोलीस प्रशासनाने पोलिसांना हाताला धरून जे काही चालविले आहे ते योग्य नाही. किरण ठाकूर यांनी म्हटलंय भारतीय भाषांना तुम्ही मानत नसाल तरी तुम्ही आमचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही.जय महाराष्ट्र लिहिलेली बस आणणारे चालक वाहक, तिचा सत्कार करणारे कार्यकर्ते व बघ्यांवरही दोन भाषिकांच्या तेढ निर्माण केल्याचा गुन्हा कर्नाटक सरकार घालत आहे, येथेच लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना तिलांजली दिल्याचे स्पष्टपणे उघड होतेय.
एकीकडे सीमावासीय जनता ढवळून निघाली असताना दुसरीकडे राष्ट्रीय पक्षातील राजकारणही सूडाच्या राजकारणात चर्चेत आले आहे. ज्या सतीश जारकीहोळींचे पालकमंत्रीपद गेले होते त्यांनी स्वतःची वर्णी अखिल भारतीय काँग्रेस च्या सेक्रेटरीपदी लावून घेतली आहे. हा हादरा काँग्रेस मधील त्यांच्यावर षडयंत्र करणाऱ्यांसाठी मोठा आहे, अनेकांना त्यातल्या त्यात काही ठरविकांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न आता सतीश करणार आहेत असे दिसते.
भाजप मधील इच्छुकांची गर्दी, काँग्रेस मधील बंडाळी यात मराठी माणसांची समिती मोठे यश मिळवू शकते, मात्र समितीतही अस्मिता असली तरी राजकारण आले की नेत्यांची तोंडे चारी बाजूने वळत आहेत. शहरात ठाकूर- दळवी, ग्रामिण मध्ये किणेकर – सुंठकर, खानापूर येथे अनेक गट यात समितीचे काय होणार? हा प्रश्न लागून आहे.
कर्नाटकाच्या कृपेने पुन्हा अस्मिता डीवचली जाऊन प्रश्नाला बळ येताना समिती नेत्यांनी स्वार्थ बाजूला ठेऊन मनोमिलन केले नाही तर जय महाराष्ट्रला न्याय मिळेल काय.?
मागच्या कर्नाटकातील भाजपा शासनावेळी विधानसभेत तरुण भारत वर बंदी आणण्याचा ठराव समंत होणार होता त्याला विरोध करण्यासाठी बेळगावमधे मोठा मोर्चा झाला त्याला जनतेने भरपूर प्रतिसाद दिला तसा आता जिल्हाधिकारी हटाव मोर्चाचे तरुण भारत कारानी रणशिंग फुकाव अस वाटत.