बेळगाव हे शांत लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. वाद अनेक आहेत तरी ते ठराविक व्यासपीठापुरते ठेऊन सामाजिक जीवनात लोक एकोप्याने जगतात. लोक संयमी आहेत तसेच ते लोकशाही मार्गाने आवाज उठविणारेही आहेत, यामुळे काहींचे फावते, गैरफायदा घेणारेही वाढतात.
सध्या या बेळगावात नेमके काय चाललेय हेच कळत नाही. गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून प्रशासन रस्ते रुंद करते आणि ते पार्किंग साठी पुरवते. भरपाई नसताना शेतकरी वर्गाच्या जमिनी बळकवतात, आणि दुसरीकडे अनधिकृत कारभार डोळ्यासमोर चालू असतानाही प्रशासन हतबल होऊन माघारी फिरते, तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तर काहीही केले तर चालते असेच हे वातावरण झाले. नियम आणि कायदे सगळ्यांना लावले तर ठीक नाहीतर जनता पेटून उठल्याशिवाय राहील काय?
त्या महानगरपालिकेत एक आमदारांचे अतिक्रमण रोखण्यासाठी सारेच एक झालेत, यामुळे ते काम होऊ शकलेले नाही.आमदार धमकी देतात माझ्या अनधिकृत इमारतींवर हातोडा मारूनच बघा, तुमची सगळी कुंडलीच काढतो.मग बाकीचे नाटकी निष्ठावान परत येतात. हे काय चाललेय?
परवा परवा एक युवकाला अटक झाली. क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा संघ जिंकला म्हणून भारताबद्दल चुकीचे कंमेन्ट त्याने फेसबुक वर केले.अटक झालेला युवक नावाने मुस्लिम होता. आत्ता मुसलमान विरोधींना इतके कारण पुरे असते जातीय तेढ निर्माण करायला, त्यांचे कामही सुरू झाले असेल. सध्या रमजानच्या महिन्यात मुस्लिम धर्म मनापासून मानणारे कुणीही असे वागत नाहीत, जो तसा वागला तो मुस्लिम असण्यापलीकडे विकृत होता किंवा आहे, अशी विकृत माणसे धर्माला काळिमा लावतात आणि जातीय असंतोषाचे कारण ठरतात अशांचा बंदोबस्त झाला तरच सामाजिक हित राखले जाईल.
दुसरा एक मुद्दा आहे सोशल मिडियाचाच. या मीडियाचा वापर करून फेक अकोउंट काढुन काही मंडळी इतरांना त्रास देत आहेत, पैसे खाण्याचे आणि जाळ्यात पकडण्याचे धंदे बेळगावमध्ये वाढतायेत.याला आला घातला पाहिजे. म्हणून बेळगाव live विचारतय… या बेळगावात चाललेय तरी काय ?