Tuesday, November 19, 2024

/

आजकी आवाज की दुनिया क्लेश कारक ठरतेय. सुनो मेरी आवाज मेरे दोस्तों

 belgaum

Shivaji nangareबेळगाव येथे एका मंगल कार्यालयात नुकताच एक गायन कार्यक्रम बघण्याचा योग आला. गायक प्रसिद्ध आहे आणि त्याचे गुरुही संगीत क्षेत्रातील एक दिग्गज अव्वल व्यक्तिमत्व. गायकानं सुरुवातीपासुनच आपली गायकी अत्युत्तम आहे हे सिद्ध करत श्रोत्या दर्शकांवर मोहिनी घातली. रसाळ निवेदनानं गायन कार्यक्रमाला मखमली साज चढवला होता. हे इथपर्यंत ठीक होतं आणि माशी शिंकली.
साउंड सिस्टीमची सुत्रं हाती घेतलेल्या युवकानं सिस्टीमच्या आवाजाची सामान्य असलेली पातळी वाढवली आणि कार्यक्रम बघणं आणि ऐकणं नकोसं झालं. संगीत कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी सर्वप्रथम कार्यक्रम स्थळी हजर राहिलेला मी, मंगल कार्यालयाच्या आवारातच लांब अंतरावर थांबुन व तद् नंतर बाहेर जावुन कार्यक्रम ऐकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो. विशेष म्हणजे कार्यक्रमांतर्गत गीतांच्या निवेदनावेळी हळु आवाज आणि गीतगायनाला मोठा आवाज असा विचित्र खेळ सुरु होता.
अखेरीस उद्विग्न होऊन मी माझ्या घरचा रस्ता धरला. हे झालं या संगीत कार्यक्रमा विषयी, पण हे असं का व्हावं? फार मोठा आवाज काहींना का आवडतोय? हळु गोड मंजुळ आवाजापासुन ही मंडळी काडिमोड़ का घेवु इच्छितेय? आवाजाचा दणदणाट ऐकत कर्णेंद्रियांना त्रास देणं स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या, ही अंगी नव्यानं आलेली विकृती नव्हे काय? असे कितीतरी प्रश्न एकाच वेळेला माझ्या मनात थैमान घालत होते.
आज सभोवतालच्या दैनंदिन जनजीवनाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास काय दिसतं? बुलेट मोटरसायकलच्या असलेल्या मुळ आवाजापेक्षाही साइलेंसरचा मोठा आवाज करून घेण्याकडे तरुणाई वळतेय. उजाडायला काहीसा अवकाश असताना सकाळच्या नीरव वातावरणात फाट!! फाट! आवाज करत एखादी बुलेट मोटरसायकल रस्त्यानं गेली की आजुबाजुला असलेल्या घरांत विश्रांती घेत असलेल्या माणसांना हा आवाज सहन करणं त्यांच्या शक्तिपलिकडचं होऊन बसतंय आणि हे आता नित्याचंच झालंय. अचानक दहा पंधरा तरुणांचा गट मोटर सायकल वरुन येतो. रस्त्याच्या मधोमध थांबुन वा जात असताना प्रचंड गलका करतो. हेच का संस्कार? हीच काय आमची भारतीय संस्कृती?
घराघरांत डॉल्बी राक्षसाचं प्रस्थ आता वाढ़तंय. पूर्वी कार मध्ये स्टिरियो सिस्टम असायची. कॅसेट वा सिडिवर लावलेल्या गाण्यांचे मंजुळ स्वर कानी पडत आणि खूप समाधान वाटे. अशा बऱ्याच गोष्टी तेव्हा मर्यादेनं चालत. आज हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या डॉल्बीच्या जिवघेण्या आवाजात अशी कोणती गोडी लपलेय? दान!!!दान!! आवाजा व्यतिरिक्त या कल्लोळात इतर कोणत्याही वाद्याचा आवाज नसतो. कुठून अवतीर्ण झाला हा अरबट चरबट धिंगाना? आम्ही त्यात रुची का दाखवतोय? वैविध्य संपन्न भारतीय संगीतापासुन आम्ही दूर जातोय काय?
एक बोलकं उदाहरण म्हणून हा किस्सा पुरेसा आहे. बेळगाव शहराच्या उपनगरातील अनगोळ येथे एका प्रसिद्ध डॉक्टरांचं मॅटर्निटी आणि जनरल हॉस्पिटल आहे. नवरात्रीचे ते दिवस होते त्यामुळे गल्लोगल्ली, छोट्या मैदानात गरबा नृत्यांना बहर आला होता. डॉल्बिचं अवास्तव स्तोम हे साथीला होतंच. मी माझ्या लहान मुलाला डॉक्टरना दाखवायला घेवुन गेलो होतो कारण तो तापानं आजारी होता. हॉस्पिटल मध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा पलिकडच्या मैदानात डॉल्बिच्या आवाजावर गरबा नृत्य करणाऱ्यांची पावलं थिरकत होती. टिपऱ्या वाजत होत्या. डॉल्बिचा आवाज हळु होता पण जसजशी वेळ वाढ़त गेली तसतशी डॉल्बिच्या आवाजाची पातळी वाढत गेली.
अखेरीस हॉस्पिटलच्या आवारात थांबणं नकोसं वाटु लागलं. आम्ही आत जावुन बाकड्यावर बसलो. मुलगा म्हणाला” बाबा उद्या सकाळी येवु,मला या आवाजाचा त्रास होतोय” एवढ्यात आमचा नंबर आला आणि आम्ही आत गेलो. डॉक्टर माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. त्यांना मी म्हणालो ” सर! हा डॉल्बिचा दणदणाट इथं शांत वातावरण हवं, इथं प्रसूती गृह आणि हॉस्पिटल आहे म्हणून निदान डॉल्बिच्या आवाजाचा हा भडिमार लोकांनी करू नये. हे यांना का कळत नाही? तुम्ही पोलिसांत तक्रार केला होता काय?” डॉक्टर हताश होऊन म्हणाले, “सगळं झालेलं आहे पण Nobody is taking action against this. alas! जन्मलेली मुलं अर्भकं यांच्या ईवल्याशा हृदयाला या आवाजाचा त्रास पेलवत नाही. एवढंच काही वाईट होऊ नये. मी सगळा भार ईश्वरावर सोडलेला आहे.” डॉक्टर सांगत होते मी खिन्न मनानं ऐकत होतो काहीसा भावुक होऊन.
दवाखान्यातील गर्दी आता कमी झाली होती. डॉक्टर पुढं म्हणाले, ” एकदा जिल्हा न्यायाधिशांची मुलगी प्रसूतीसाठी माझ्या मॅटर्निटी होम मध्ये दाखल झाली होती. ते दिवसही नवरात्रौत्सवाचेच होते. तिची प्रसूती आम्ही केली आणि इकडे हॉस्पिटलला डॉल्बिचा दणका बसु लागला. न्यायाधिशांची मुलगी इथं दाखल आहे काहीतरी नक्कीच ऍक्शन घेतली जाईल म्हणून मी न्यायाधिश साहेबांना फोन केला. काही वेळानं साहेब दोन पोलिसांना घेवुन आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी जावुन पोलिसांनी डॉल्बि बंद करायचा आदेश दिला. डॉल्बि बंद झाला. मी समाधानानं हुश् म्हटलं. पोलिस आणि साहेब निघुन गेले आणि अर्ध्या एक तासानं पुन्हा डॉल्बिच्या आवाजाचा भड़का उडाला. मी त्वरित न्यायाधीश साहेबांना फोनवर प्राप्त परिस्थितीची जाणीव करून दिली तर ते मी बघतो एवढंच म्हणाले पण पुढे आजपावेतो काहीही कारवाई झालेली नाही. एका जिल्हा न्यायाधिशांची ही हतबलता तर सर्वसामान्य माणसानं काय करायचं? या रस्त्यावरुन डॉल्बिचा राक्षसी आवाज करत लग्नाच्या वराती जात असतात तेव्हा मी तीव्र दडपणाखाली असतो.” डॉक्टरांची विवशता मी जाणली आणि सुन्न होऊन बाहेर पडलो. इकडे तिकडे डॉल्बिचे दणदणाट सुरूच होते त्या आवाजाच्या तालावर टिपऱ्या वाजत होत्या आणि पावलं थिरकत होती विनाशाच्या दिशेनं वाटचाल करत.

लेखक शिवाजी विनायक नांगरे
(फेसबुक वरून साभार)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.