मागच्या आठवड्यात मी एक राजकीय विधान केले. समितीने एकत्र येऊन तिकीट दिले तर घेणार नाहीतर नॅशनल अर्थात राष्ट्रीय पक्षात जाणार! या विधानाने अनेकांना आनंद झाला, तर अनेकजण दुःखी कष्टी झाले, आपला लाडका माणूस हे काय करतोय? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला, एक राजकारणी म्हणून केलेले ते राजकीय विधान होते, त्या विधानातून जनतेचे माज्या वर किती प्रेम आहे, हेच कळले आहे.
हे उदगार आहेत बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजीराव पाटील यांचे. बेळगाव live ला खास मुलाखत देऊन त्यांनी आपली समिती कार्यकर्त्यांशी असलेली निष्ठा आणि एकूण राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांना आनंद झाला तो फार काळ टिकणार नाही कारण आपण कदापि तसे करणार नाही आणि ज्यांना दुःख झाले, जे पोट तिडिकीने बोलले त्यांना निराश करणार नाही, पदे येतील आणि जातील तरीही जनतेचे प्रेम किती आहे ते कळण्यासाठी हे विधान महत्वाचे ठरले आहे, नाराज होऊ नका असा दिलासा त्यांनी आपल्या कार्यकर्ते आणि चाहत्यांना दिला आहे.
मी इतरांना संभ्रमात टाकायचे म्हणून बोलून गेलो, माझे चाहते सैरभैर झाले, घरी आणि कार्यालयात प्रेम करणाऱ्या लोकांच्या रांगा लागल्या, त्यांना वाटले आपले साहेब आता आपल्याला सोडून जाणार की काय? तसे काहीच होणार नाही, मी तुमचाच आहे, तुमचाच राहणार याचा विश्वास बाळगा, असे संभाजीराव बेळगाव live ला दिलेल्या एक्सक्लुजीव मुलाखतीत म्हणाले.
आमदारकीच्या चार वर्षाच्या काळात ९८ कोटींची कामे केली, ही कामे पत्रकारांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा उद्देश होता, मला जनता ओळखते, त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीची कधीच प्रसिद्धी घेतलेली नाही. काही खास माणसांनी आग्रह केला म्हणून पत्रकारांशी बोलत होतो. काहींनी राजकीय पक्षात जाणार काय असा प्रश्न सारखा, लावून धरला, म्हणून त्यांना जे पाहिजे ते देऊन जरा जनतेचा किती विश्वास आहे ते बघितले. यातून सामान्य जनता माझ्यावर किती प्रेम करते याची कल्पना आली, जनतेचा पाठिंबा हेच आमचे बळ, या जनतेला त्रिवार मुजरा असे ते शेवटी म्हणाले आहेत.