कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे नगरविकास प्रशासन मंत्री बेळगावला आले काय आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी सीमाभागात मराठीला बळ दिले काय….! सारेच वातावरण ढवळून निघाले आहे. कर्नाटकात राहात असाल तर कर्नाटकचा आदर करा असे एक मंत्री म्हणून सांगून ते जाऊ शकले असतेही, इतका ज्येष्ठ नेता, मात्र बोलून गेला, म्हणे कर्नाटक आत्ता एक विधेयक पारित करणार…..ते कसले तर म्हणे लोकप्रतिनिधी म्हणून पदावर असताना जय महाराष्ट्र म्हणालात तर कारवाई करण्याचे! मंगळवारी म्हणे ते मनपात येऊन सगळ्या मराठी नगरसेवकांना ताकीद देणार आहेत, जय महाराष्ट्र म्हणालात तर कारवाई करू अशी धमकीवजा सूचना त्यांनी दिली आहे. ही सूचना किंवा धमकी म्हणा संपूर्ण सीमाभागात अस्मितेची आग लावून गेली आहे, पुन्हा एकदा भगवे वादळ आलंय आणि सगळीकडेच झाले आहे, जय महाराष्ट्र….महापौरांपासून पोरा टोरांपर्यंत, कारण ते कुणीही पुसू शकत नाही…..
रोशन बेग यांनी मराठीला अप्रत्यक्षरीत्या बळ दिले आणि सीमाभागात काँग्रेस पसरवू पाहणाऱ्या काँग्रेसचे मोठे नुकसान केले आहे. सीमाभागात मराठी माणसाचे अस्तित्व सांगणाऱ्या विधानसभेच्या पाच जागांपैकी एक आणि फक्त एक जागा काँग्रेस कडे आहे. बेळगाव उत्तरची ती जागा, ग्रामीणात काँग्रेस होते मात्र ते विरले होते, पुन्हा काही अस्तित्व पसरण्याचा डाव सुरू होता, यात पैसे हाच एकमेव पर्यायही अवलंबविला जातोय, तोही मनसुबा आता नेस्तनाबूत झालाय म्हणायला हरकत नाही, कारण बेळगावात जय महाराष्ट्रच्या रोशन बेग यांनी लावलेल्या ठिणगीचे बेळगाव ग्रामीण मध्ये भल्यामोठ्या आगीत रूपांतर झाले आहे, या आगीत स्थानिक काँग्रेसचे धोरण भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही, असे वातावरण दिसते.
सीमाप्रश्न नेहमी जिवंत ठेवण्यात जसा सीमावासीयांचा चिवटपणा कारणीभूत आहे, तसाच तो कर्नाटकी नेत्यांचा दडपशाहीचा कारभारही जबाबदार आहे, निवडणूक जवळ आली की कर्नाटकचे नेते चेकाळतात, आपण काय करतोय याचे भान त्यांना नसते. सिमाप्रश्नही नेहरू प्रणित काँग्रेस ने तयार केलाय, जोवर हा भाग महाराष्ट्रात जात नाही म्हणजेच हा प्रश्न सुटत नाही तोवर सगळे जय महाराष्ट्र म्हणणारच, यात वाद नाही, आणि तसे म्हणण्याला भारतीय संसद आणि लोकशाहीचा आधार आहे. येथे सगळे जय महाराष्ट्र म्हणतात आणि आपल्यातल्याच जय महाराष्ट्र म्हणणाऱ्याला निवडून देतात, पद आल्यावर त्याने जय महाराष्ट्र म्हणावे यासाठीच ही निवड होते, त्याने तसे म्हटले म्हणून त्याचे पद गेले तर बिघडणार कुणाचे, उलट अशा कारणासाठी जितकी पदे जातील तितक्या अधिक संख्येने मतदान होते आणि बेळगाव महानगरपालिकेतील मराठी जय महाराष्ट्रवाल्या नगरसेवकांची संख्या वाढत जाते, हे रोशन बेग यांनी एक राजकारणी म्हणून ध्यानात घ्यायला नको होते काय? त्यांनी ते घेतले नाही यात नुकसान त्यांच्याच पक्षाचे आणि स्थानिक इच्छुकांचे होणार यात वाद नाही.
मराठी नगरसेवक , महापौर आणि सत्ताधारी गटनेते यांची भूमिका आता महत्वाची ठरेल, नगरसेवक पद गेले तरी चालेल मात्र जय महाराष्ट्र म्हणणारच असे नुसते व्हिडिओ प्रसारित करून ते आता शांत बसू शकत नाहीत. ज्या विधेयकाद्वारे मराठी नगरसेवक आणि एकूणच लोकप्रतिनिधींवर कारवाईची तरतूद करण्याची भाषा रोशन बेग यांच्या मुखातून कर्नाटकाने चालविली आहे, त्या विधेयकालाच विरोध करावा लागेल. महा पालिकेत सत्ताधारी गटाने या विधेयकाला विरोध करणारा ठराव संमत करून तो सरकारकडे मांडावा लागेल. सीमावासीयांच्या दोघा आमदारांनीही यात साथ देणे आवश्यक असेल, आणि ज्यादिवशी सरकार हे विधेयक मांडेल त्याच दिवशी दोन्ही समिती आमदारांनी विधानसभेत जाऊन आपला मतदानाच्या माध्यमातील विरोधही दाखवला पाहिजे. ३३ नगरसेवक आणि २ आमदारांनी या विधेयकाला विरोध केला आणि तोही मतदान व ठरावाच्या माध्यमाने तर कर्नाटक सरकारचे काहीच चालणार नाही. सिमा भागातल्या ग्रामपंचायतीही याला आपापल्या ठरावाच्या रूपाने नक्कीच साथ देतील.
रोशन बेग यांचे आभार मानावे तितके कमीच. पूर्वी वंदे मातरम म्हटले की ब्रिटिश कारावासात घालत, आज कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हटले की लोकनियुक्त पदे जातील. हे सरकार अच्छे दिन वाल्यांचे नाही पण केंद्रातून तसे चांगल्या दिवसांचे स्वप्न दाखवणाऱ्या आणि ज्या महाराष्ट्राची भक्ती होतेय तेथे सत्ता गाजविणाऱ्या भाजपवाल्यांनी इकडे बघायला पाहिजे, बुरे दिन जावेत म्हणून सीमावासीयांचा आवाज होण्यासाठी आता महाराष्ट्र पूर्ण ताकदीने उभा रहायला हवा, जय महाराष्ट्र म्हणत पाठीवर लाठी झेलणाऱ्याची कदर ठेवण्यासाठी.