भगवान महावीर जयंतीनिमित्त समस्त जैन समाजातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली . शोभायात्रेत हजारो जैन बांधव भगिनी ,तरुण तरुणी सहभागी झाले होते .
पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि मान्यवरांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र चौकातून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला . शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती . शहर आणि परिसरातील अनेक मंडळांनी आपल्या चित्ररथावर भगवान महावीर यांच्या जीवनातील प्रसंगांचे सादर केले होते . चित्ररथावर भगवान महावीरांचे पूजन करण्यात आले होते . अनेक बँड पथकाबरोबरच शहरातील झाँज पथके आणि परगावातून आलेल्या कलापथकानी शोभायात्रेत आपल्या कलेचे दर्शन घडवले . भल्या मोठ्या हलगी वाजवणाऱ्या पथकाने तर शोभायात्रेच्या मार्गावरील लोकांची मने जिंकली . अनेक पौराणिक देखावेही चित्ररथावर साकारण्यात आले होते . अनेक तरुण तरुणी बँडच्या तालावर नृत्य करत होते . अनेक बैलजोड्या देखील शोभायात्रेची शोभा वाढवत होत्या .गोहत्या रोखण्याचा संदेशही शोभायात्रेतून देण्यात आला . शोभायात्रेच्या मार्गावर मोफत पाणी ,सरबत ,आंबील ,ताक वितरित करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी स्टॉल लावले होते . शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती .