नुकत्याच मध्यवर्ती समितीच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया ज्येष्ठनेते एन डी पाटील यांनी पार पाडली. या निवडीत बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील घटक समिती पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचे प्रमोशन झाले, आता त्यांच्या जुन्या पदांवरही त्यांचाच भार न ठेवता ती रिकामी करून त्या जागेवर नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची गरज आहे.
ज्येष्ठ नेते माजी आमदार वसंतराव पाटील मध्यवर्तीच्या अध्यक्ष स्थानी होते, याखेरीज खानापूर तालुका समितीत त्यांनी कोणतीही जागा अडवून ठेवली नव्हती. त्यांचा आदर्श बाळगायचा झाल्यास विध्यमान अध्यक्ष दीपक दळवी यांनीही बेळगाव शहर समिती मधील आपली जागा खाली करून दुसऱ्या नव युवकांना वाव देणे महत्वाचे आहे.
मनोहर किणेकर मध्यवर्तीच्या कार्याध्यक्ष पदावर आहेत. एन डी सरांचा प्रामाणिक विध्यार्थी या नात्याने नवे पद निर्माण करून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र ते पूर्वी असलेल्या तालुका समितीच्या कार्याध्यक्ष पदावर कोण हे अजून स्पष्ट नाही, दोन्ही पदे लाडक्याच्या गळ्यात असाच प्रकार सध्या दिसत आहे. नेते ज्येष्ठ असले तरी त्यांना सतत डोळ्यासमोर दिसतो तो बाब्या आणि तळागाळात राबणारी बाकी सगळी कारटी हे चित्र बदलण्याची गरज आहे. बेळगाव तालुक्यात कार्याध्यक्ष होण्याच्या लायकीचे अनेक तरुण कार्यकर्ते आहेत यामुळे किणेकरांनी पद अडवून न बसता दुसऱ्यांच्या निष्टेचा विचार करायला हवा. असे सामान्य कार्यकर्ते बोलताहेत.
जसे एक व्यक्ती एक पद तसेच मध्यवर्तीत समविष्ठांनी यापुढे कोणत्याही निवडणुकीत स्वतःसाठी जागा मागणेही बंद व्हायला हवे असे विचार येत आहेत. ते तितकेच स्वागतार्ह आहेत. एकदा उच्च पिठावर स्थानापन्न झाल्यावर निवडणूक, नगरसेवक, आमदारकी अशी स्वार्थी स्वप्ने न बघता इतर तरुणांना घडवून त्यांना मार्गदर्शन करून सत्ता खेचून आणण्यासाठी दुवा होण्याची कामे करायला हवीत, तसे न झाल्यास अशा मंडळींची मध्यवर्तितून तात्काळ हकालपट्टी होण्याची गरज आहे, केवळ दिवंगत वसंतरावांच्या फोटोचे पूजन करून काहीच होणार नाही, पदाची आशा सोडून त्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण होणे तितकेच महत्वाचे आहे.
दीपक दळवी प्रगल्भ आहेत. त्यांना नेतृत्व आणि मोठेपणाची कल्पना आहे, जे काही करू ते स्वतःच्या उमेदवारीसाठी हे त्यांचे ध्येय नाही, मात्र तसे वागणाऱ्या इतरांबद्दल सध्या उलटसुलट चर्चा आहेत, त्यांनी पदांच्या जोरावर पुन्हा संधीसाधुपण केल्यास जनता त्यावर बारीक लक्ष ठेवून आहे.
कोणताही लढा आंदोलन यशस्वी व्हायचं असेल तर युवकांचा सहभाग अत्यावश्यक आहे त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यात युवकांची संख्या वाढली पाहिजेत. आमदार संभाजी पाटील यांनी आमदारकीच पद भोगत असतेवेळी नगरसेवक पद सोडलं नव्हतं… हा इतिहास बदलला गेला पाहिजेत यासाठीच महाराष्ट्र एकीकरण समितीने एक व्यक्ती एक पद ही संकल्पना राबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.