Monday, January 6, 2025

/

वेध आगामी विधानसभेचे -म ए समितीच्या उमेदवार निवडीकडे लक्ष्य कर्नाटकचे

 belgaum

परवा परवा शाहीर अमर शेखांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम झाला. सीमाभागाचे ज्येष्ठ नेते आणि समितीच्या एकंदर विजयासाठी नेहमीच जय आणि पराजय निश्चितीत महत्वाची भूमिका ठरविणारे किरण ठाकूर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भरगोस विजयाचे सूतोवाच केले. सध्या सर्वत्रच आगामी विधानसभेचे वेध लागले आहेत, या स्थितीत समितीची उमेदवार निवड कशी असणार याकडे तमाम कर्नाटका चे आत्तापासूनच लक्ष्य लागून राहिले आहे.
निवडणूक आणखी एक वर्षाने होईल मात्र सर्व राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. सीमाभाग हा समितीचा बालेकिल्ला, यात पूर्वी समितीचे ११, कालांतराने ७, अलीकडच्या काळात ५ आणि नंतर फुटीच्या राजकारणात २ उमेदवार आमदार पदाची शर्यत जिंकताहेत. समितीत जितकी फूट पडेल तितका फायदा हे राजकीय पक्षांना चांगलेच माहित आहे, यामुळे त्यासाठीचे प्रयत्नही होतील, यात ज्या बेळगाव दक्षिण आणि खानापूर मतदार संघात समितीची सत्ता आहे तेथे ती राखून बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण तसेच आणखी एका नव्या मात्र मराठी बहुल मतदार संघात समितीची सत्ता खेचून आणण्यासाठी समितीची व्यूहरचना सुरु झाली आहे हे मात्र नक्की.
सध्या देशाचे राजकारण मोदींची लाट ठरवत आहे. कर्नाटकातही सगळीकडे हे गणित चालणार आहे, अशा काळात सीमाप्रश्नासाठी आपले सांख्यबल दाखविण्याच्या इर्षेपायी सगळीकडे एकच उमेदवार हवा हे समितीचे धोरण असावे लागेल, फूट पडली आणि सत्तेची लालसा झाली की काय होते याचे चित्र मागील निवडणुकीत अनुभवलेल्या मराठी माणसाला आता स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे लागेल, तेही एकजूटीच्या जोरावरच. याकामी किरण ठाकूर निर्णायक ठरतील तसेच दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर आणि तालुक्याच्या राजकारणात आघाडीवर असलेल्या नेतेमंडळींची भूमिकाही महत्वाची ठरेल.

खानापूरात अरविंद पाटलांच पारड जड

सध्या खानापूर मतदार संघात आमदार अरविंद पाटील यांचे वजन आहे. स्वतःच्या कामांच्या जोरावर त्यांनी ते सिद्ध केले आहे, यामुळे जनतेचा कौल पूर्णपणे त्यांच्याच मागे आहे. यावेळीही उमेदवार अरविंद पाटील असले तरच सत्ता कायम राहील आणि फुटीचा फटका बसला तर सत्ता जाईल असे वातावरण असल्याने फुटकर्त्या मंडळींनी आपले स्वप्न बाजूला ठेऊन या मतदार संघातील वर्चस्व कायम राखण्याची गरज आहे.

दक्षिणेत राहणार खरी चुरस
बेळगाव दक्षिण ची मागची निवडणूक गाजली आहे. तेथील मागचे भाजप आमदार अभय पाटील यांचा पराभव करायचाच हे ठरवून संभाजी पाटील यांना उमेदवारी दिली गेली, आणि इर्षेने निवडणूक जिंकली, यात ठाकूर आणि पाटील यांच्यातील जुन्या २२ वर्षे असलेल्या संघर्षाचाही अस्त झाला आहे. आता येथे पुन्हा सत्ता राखण्यासाठी पुन्हा संभाजी पाटील यांचाच उपयोग होणार की तेथे नवे नेतृत्व मिळणार हे समितीच्या नव्या धोरणाचे गिमिक अजून स्पष्ट नाही. या मतदार संघात मराठा मोर्चाच्या निमित्ताने प्रकाश मरगाळे हे चर्चेत आहेत, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मुतगेकर यांच्याही नावाची चर्चा आहे यामुळे नेमके उमेदवार कोण असतील याकडे साऱ्यांचेच डोळे आहेत. सध्या नगरसेवक असलेले काहीजणही गुड घ्याला बाशिंग बांधून बसले असताना त्यांचे वजन कितपत पुरेल हे तपासण्याचे दिव्यही आहेच.

दिग्गज मागताहेत उत्तरेत उम्मेद्वारी
उत्तर मतदार संघातही कसोटी लागणार आहे. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर तेथे पडल्या आणि काँग्रेस ने सलग दोनदा सत्ता खेचली यामुळे पुन्हा रेणू देखील उम्मेद्वारी साठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकत्याच महापौरपद भूषविलेले सरिता पाटील यांचा पत्ता ऐनवेळी पुढे येईल अशी चर्चा आहे, याचवेळी किरण सायनाक यांनीही उत्तरेत उमेदवारी मिळवणार असा दावा केला आहे. आमदार संभाजी पाटील दक्षिणेत दुसरा बलाढ्य उमेदवार मिळाला तर उत्तरेत स्वतः उमेदवारी भरून सत्ता खेचून आणू असा दावा करीत असल्याचे कानावर आहे.

दुहीतून बाहेर पडेल का ग्रामीण

ग्रामीणचे राजकारण फुटीने संपले आहे. माजी आमदार मनोहर किणेकर यांचा हट्ट आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांची बंडखोरी सलग दोनदा पराभव करून गेली यामुळे या दोघांनाही बाजूला ठेवा आणि दुसरा नवा चेहरा पुढे आणा असा विचार पुढे आला आहे. ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांनी मागील दोनदा किणेकर यांच्या मागे लावली, तरीही ते पराभूत झाले, यापैकी एका पराभवात किरण ठाकूर सुंठकरांच्या बरोबर होते यामुळे ठाकूर आणि किणेकर असा नवा संघर्ष सुरू होऊन तो न्यायालयीन लढाई पर्यंत जाऊन पोचला. आता किणेकर हे वाद मिटवून बाजी मारणार की नवे उमेदवार देणार हे अस्पष्ट आहे. सध्या जी प वर सदस्य असणाऱ्या सरस्वती पाटील किंवा त्यांचे पती आर आय पाटील यांचीही चर्चा आहे. याचवेळी मराठी भाषिक युवा आघाडीचे भाऊराव गडकरी, बांधकाम कंत्राटदार एस एल चौगुले किंवा नव्या दमा चे एस एम बेळवटकर यांचीही चर्चा आहेच. दगड द्या पण एकच द्या ही तालुक्यातल्या जनतेची भावना आहे यात योग्यवेळी योग्य निर्णय घ्यावा लागेल.
समितीच्या एकूणच व्यूहरचनेवर जय पराजय ठरेल त्याची तयारी आत्ताच झाली तर राजकीय पक्षांचे धाबे    दणाणणार आहेत .

पुढील भागात वाचा काय असेल काँग्रेस ची व्यूह रचना?ekikaran samiti belgaum

 belgaum

1 COMMENT

  1. महाराष्ट्र एकिकरण समिती मधे आधिपेक्षा जास्त बळकटी आली आहे याच कारण युवाशक्तीची आमच्याकडे ओढ आणी मराठा-मराठी क्रांती मोर्चा.जनता अजूनही एकनिष्ठ आहे पण खोटी आश्वासन आणी मोठमोठी भाषण ठोकत मी यव करतो त्यव करतो सांगून जनतेच्या हातात धूपाटन देणारा त्यातच मतांची भिक मागतानां घरोघरी जाऊन हात जोडणारा निवडूण आल्यावर काम होण्यासाठी त्यांच्या घरच्या पायर्या झिजवा म्हणणारा आणी जनतेने निष्पूठेने हरवलेल्याला पूढील वेळी हे भावी आमदार तूमची काम करतील म्हणत जनतेच्या भावनांचा चुराडा करणार्यानां उमेदवारी दिल्यास पूढे झालेल्या नेत्यांना जनता जाबच काय तर अंगावर धावून गेल्याशिवाय राहणार नाही.कारण आता गुन्ह्यातून कस सूटायच हेही सर्वांना माहीत आहे तर योग्य धडा शिकवायचाच अस ठरवलय.तेंव्हा उमेदवार ठरवतानां सांभाळून.अन्यथा अघटीत घडण्याआधी सर्वसमावेशकता समोर ठेवून जनतेला उमेदवार द्या येवढीच मनोमन अपेक्षा कारण आमच्यातीलच गद्दारी करत समितीचा उमेदवार पाडण्यासाठी राष्ट्रीय पक्षाकडून पैसे खावून धडपडणार्या औलादी काय कमी नहीत.का तर त्यांच्यात तिच अनुवंशीकता असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.