बेळगाव दि ११ – उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाच्या विधान सभा निवडणुका जिंकल्याच्या खुशीत बेळगावच्या भाजप नेत्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बलिदाना दिवशी जल्लोष केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे . खासदार सुरेश अंगडी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयोत्सव झाला मोठा, छत्रपती शंभुराज्यांच्या बलिदान दिनाच्या भानाचा तोटा असेच दुर्दैवी चित्र समोर आले आहे.
शनिवारी दुपारी भाजपने उत्तर प्रदेश निवडणुका ऐतिहासिकरित्या जिंकल्याने विजयोत्सव साजरा केला. खासदार सुरेश अंगडी यांच्यासह भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विजयोत्सव साजरा केला खरा पण धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर केलेला जल्लोष हा वादाचा विषय बनला आहे.
११ मार्च १६८९ साली संभाजी महाराजांची हत्त्या झाली होती या दिवशी अनेक कार्यकर्ते संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून पाळतात. अनेक युवक फेब्रुवारी महिन्यापासून एक महिना बलिदान मांसाचे आचरणही करतात.
त्यामुळे ११ मार्चला विजयोत्सव करताना संभाजी महाराजांच्या पुतळ्या समोर जल्लोष केलेला फोटो वायरल झाल्याने सोशल मिडीयावर वादाचा विषय बनला आहे . सोशल मिडीयावर भाजप नेते कसे भगव्या विरोधात आहेत या बद्दल जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुरेश अंगडी नेहमीच मराठी मतांवर निवडून येतात, त्यांनी तरी भान बाळगायचे होते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.